गडचिरोली : भामरागड एकत्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दुधाळ गाय वाटप योजनेते घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी आयएएस शुभम गुप्ता यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. १९ ऑगस्टला भामरागडातील एका आदिवासी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार स्वाक्षरी न केल्याने बेघर करण्याची धमकी दिली, काही दिवसांनी खरोखरच माझा संसार रस्त्यावर आणला, मला खोट्या गुन्ह्यात गोवले तर पतीला कार्यालयात बोलावून धमकावले, अशी गंभीर तक्रार भारती इष्टाम या महिलेने केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आयएएस’ शुभम गुप्ता चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रारीचा ओघ वाढत आहे. भारती इष्टाम या भामरागडच्या रहिवासी असून त्यांच्याकडे गॅस एजन्सी आहे. शिवाय विविध सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. १९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शुभम गुप्तांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व भामरागडमध्ये आदिवासी एकात्मिक प्रकल्प अधिकारी असलेल्या आयएएस शुभम गुप्ता हे २०२१-२२ मध्ये भामरागड नगरपंचायतीचे प्रशासक देखील होते. भामरागड नगरपंचायत इमारतीसाठी ०.९९ हेक्टर जागा हस्तगत करण्यासाठी वनहक्क समितीचा ठराव आवश्यक होता. वनहक्क समितीवर मी देखील होते. या समितीच्या ठरावासाठी शुभम गुप्ता यांनी कार्यालयात बोलावले. सह्या व ठराव न दिल्यास उद्ध्वस्थ करण्याची धमकी दिली. मी विरोधावर ठाम राहिल्याने माझ्यावर त्यावेळचे तहसीलदार अनमोल कांबळे व नगरपंचायतीचे अधिकारी सूरज जाधव यांच्याकडून दबाव आणण्यास सुरुवात केली. याच दरम्यान माझ्या गॅस एजन्सीची तपासणी केली, त्यात काही न आढळल्याने मला जागा खाली करायला लावली. त्यानंतर वारंवार पत्र पाठवून मला त्रास देण्यास सुरुवात केली. या दरम्यान माझ्यावर कलम १०७ व कलम १११ अन्वये गुन्हा नोंद केला. शिवाय पतीला कार्यालयात बोलावून धमकावले. माझी मुले शिक्षणासाठी बाहेर होती, मानसिक ताणतणावात त्यांना मी पैसे पुरवू शकले नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटले, असेही पत्रात नमूद आहे.

हेही वाचा – ‘एमपीएससी’ संयुक्त परीक्षेची जाहिरात कधी येणार बघा? आयोगाने सांगितले…

मला न्याय हवा

भारती इष्टाम यांनी पत्रात नमूद केल्यानुसार , मी शुभम गुप्तांविरोधात अनेकांकडे दाद मागितली, उंबरठे झिजवले, पण न्याय मिळाला नाही. आदिवासी नेतेही या प्रकरणात मौन होते. बेघर करुन, खोट्या गुन्ह्यात गोवून सूड उगविणाऱ्या गुप्तांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एका आदिवासी महिलेची हालअपेष्टा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वाट्याला असा वाईट अनुभव येत असेल तर यापेक्षा लाजीरवाणी बाब नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘डॉ.पं.दे.कृ.वि.’च्या स्थापनेला बलिदानाचा इतिहास, ५६ वर्षांपूर्वी काय झाले होते ?

यासंदर्भात आयएएस शुभम गुप्ता यांना संपर्क केला असता मला याबाबत काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे आता या तक्रारीची शासन स्तरावरून शहानिशा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli another action of ias shubham gupta the woman was made homeless also implicated in a false crime ssp 89 ssb