गडचिरोली : लोकसभा निवडणूक आचारसंहिता अवघ्या काही दिवसांत लागणार अशी चिन्हे असताना महाविकाआघाडी आणि महायुतीचे उमेदवार अद्याप घोषित न झाल्याने सर्वच गोटात चिंतेचे वातावरण आहे. तर इच्छुक नेत्यांना वरिष्ठ नेतृत्वाने “चिंता करू नका, तुमचंच नाव फायनल होणार” या आश्वासनावर ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास गडचिरोली-चिमूर राज्यात सर्वाधिक मोठे लोकसभा क्षेत्र आहे. त्यामुळे येथील उमेदवारांना प्रचाराकरिता इतर क्षेत्राच्या तुलनेत पाचपट अधिक परिश्रम घ्यावे लागते. अशात महाविकासआघाडी आणि महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यांसह इच्छुकांचे ‘टेन्शन’ वाढले आहे.

हेही वाचा – आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?

मधल्या काळात घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले. याचा फटका शेवटच्या टोकावरील गडचिरोलीलादेखील बसतो आहे. महायुतीची अवस्था बघितल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विद्यमान खासदार अशोक नेते आणि संघपरिवाराकडून समोर करण्यात आलेले डॉ. मिलिंद नरोटे या तिघांपैकी एक महायुतीचा उमेदवार असणार हे आता निश्चित झाले आहे. परंतु अंतिम नाव अद्याप पुढे आलेले नाही. तिघांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यासाठी दिल्लीवारी, नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असून वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना “चिंता करू नका, तुमचंच तिकीट फायनल होणार” तयारीला लागा, असे सांगितल्याने तिघेही खासगीत आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा करीत आहे. तर तुलनेने महाविकासआघाडीत घटक पक्षातील नेते सुस्त असल्याने केवळ काँग्रेसमधूनच दावेदारी करण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि डॉ. नामदेव किरसान यापैकी एक नाव महाविकास आघाडीकडून निश्चित होईल.

हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

या दोघांनाही पक्षनेतृत्वाने “तुम्हीच उमेदवार” असे आश्वासन दिल्याचे कळते. त्यामुळे दोघांनीही बाशिंग बांधले आहे. स्थानिक नेत्यांना विचारल्यास आमचा उमेदवार ‘नामदेव’ राहणार असे ते सांगताना दिसतात. येत्या दोन दिवसात हा संभ्रम दूर होणार असला तरी प्रचारासाठी मिळालेला कमी कालावधी उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli chimur lok sabha election mahayuti and maha vikas aghadi workers await candidate announcement ssp 89 ssb
Show comments