गडचिरोली : येथील जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. पाचखेडे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी त्यांच्यावर अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप ठेवला आहे. १२ डिसेंबर रोजीचा हा घटनाक्रम असून, १३ डिसेंबर रोजी या कर्मचाऱ्याने थेट राज्याच्या प्रधान सचिवांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन पानांची लेखी तक्रार केल्याने ‘नियोजन’मधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निकलेश मुखरू दडमल, असे तक्रारदार कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जिल्हा नियोजन विभागात सांख्यिकी सहायक पदावर कार्यरत आहेत. या तक्रारीत सविस्तर घटनाक्रम दिला असून, मानसिक खच्चीकरण झाल्याचा दावा केला आहे. कनिष्ठांशी त्यांची वर्तणूक व्यवस्थित नाही. त्यामुळे इतर कर्मचारीदेखील त्रस्त असल्याचा दावा दडमल यांनी केला आहे. या तक्रार अर्जावर सहायक संशोधन अधिकारी आर. डी. ठाकूर, डी. व्ही. रहांगडले, एन. व्ही. रहांगडले, के. बी. मुंडे, सांख्यिकी सहायक एस. ए. बल्लेवार, एन. एम. पेदापल्ली, महसूल सहायक संजय गजभिये यांच्या स्वाक्षऱ्या आहे. तक्रार अर्जानुसार, १२ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता सांख्यिकी सहायक निकलेश दडमल हे आपल्या टेबलवर काम करत होते. यावेळी एक कंत्राटदार कार्यालयात आले. जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. पाचखेडे कार्यालयात नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराने दडमल यांच्याकडे येऊन कामाची विचारपूस केली. यावर दडमल यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची कामे मला विचारल्याशिवाय करू नका, अशी ताकीद दिलेली आहे, असे सांगितले. त्यामुळे कंत्राटदाराने त्यांना फोन करून कामाबाबत दडमल यांना सूचना द्या, अशी विनंती केली. त्यावर पलीकडून पाचखेडे यांनी दडमल यांना अर्वाच्य शब्दांत शिव्यांची लाखोली वाहिली.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Expansion : “…पण, आतापर्यंत फोन आला नाही”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवेंद्रराजेंनी काय सांगितले?

कंत्राटदारांचा कब्जा

तक्रारीत एस. बी. पाचखेडे हे फाईल लवकर निकाली काढत नाहीत, असा आरोप केला आहे. कोणतीही आर्थिक बाबीची फाईल मला विचारल्याशिवाय समोर करायची नाही, अशी त्यांची सूचना आहे. कंत्राटदारांना एक-एक तास कक्षात घेऊन बसतात व कनिष्ठ कर्मचाऱ्यांना समोर बोलावून कामे करण्यास बाध्य करतात, असाही आरोप केला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील कारकीर्दही वादग्रस्त

दरम्यान, पाचखेडे हे यापूर्वी गोंदिया जिल्ह्यात कार्यरत होते. सहकारी महिला अधिकाऱ्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर त्यांची गडचिरोलीत जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून बदली केली होती. या कार्यालयातही त्यांचे कर्मचाऱ्यांनी वर्तन योग्य नव्हते, असे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा – जाहिरातीविना कंत्राटी पदभरती, गडचिरोलीतील स्थानिक युवकांमध्ये असंतोष

या प्रकरणात माझा काहीही दोष नाही. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. मला विनाकारण या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. – एस. बी. पाचखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी

तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. नेमकी काय तक्रार आहे, ते पाहतो. तक्रारीची खातरजमा करावी लागेल, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. – संजय दैने, जिल्हाधिकारी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli compaint of district planning officer abuse employees ssp 89 ssb