गडचिरोली : काँग्रेस पक्षाकडून रविवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या यादीत आरमोरीचा समावेश असून येथील रामदास मसराम यांना संधी देण्यात आली आहे. याठिकाणी माजी आमदार आनंदराव गेडाम इच्छुक होते. आरमोरीच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील तीनही विधानसभेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आरमोरी विधासभेत काँग्रेसकडून सर्वाधिक इच्छुक होते. त्यामुळे येथील उमेदवार निवडीवरून पक्षात बरीच चर्चा झाली. निवड समितीने अखेर रामदास मसराम यांच्या नावाला पसंती दिल्याने या जागेचा तिढा सुटला. याठिकाणी भाजपकडून पहिल्याच यादीत नाव असलेले आमदार कृष्णा गजबे विरुद्ध रामदास मसराम अशी थेट लढत होणार आहे. विद्यमान आमदारांची तिसरी टर्म असल्याने यंदा भाजपाला ही निवडणूक मागील दोन वेळेस इतकी सोपी नसेल. गडचिरोलीत भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे विरुद्ध मनोहर पोरेटी अशी लढत होणार आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दोघांसमोरही लहान पक्ष आणि अपक्षांचे आव्हान असणार आहे. अहेरीत मात्र यंदा तिहेरी लढत होण्याची चिन्हे आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम तर भाजपचे बंडखोर उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम अशी तिहेरी लढत होणार आहे. काँग्रेसकडूनही बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने अहेरीत महाविकास आघाडी आणि महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. यंदा आत्राम राजघरण्यातील तिघे विधानसभेच्या मैदानात असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा – वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….
हेही वाचा – “दादाराव केचे आर्वीतून उमेदवारी अर्ज भरणार, पण…”, सुधीर दिवे म्हणाले…
मनसेकडून दोन उमेदवारांची घोषणा
जिल्ह्यातील आरमोरी आणि अहेरी या दोन विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. रविवारी उशिरा या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अहेरी विधानसभेतून संदीप कोरेत तर आरमोरीतून शिवसेनेचे माजी आमदार रामकृष्ण मडावी यांच समावेश आहे. संघ स्वयंसेवक असलेले संदीप कोरेत यांनी सुरवातीला उमेदवारीसाठी भाजपकडून प्रयत्न केले. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे गेले. तिकडेही संधी न मिळाल्याने अखेर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. आरमोरीत देखील शिवसेनेकडून संधी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर मडावी यांनी मनसेत प्रवेश केला.