गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतल्याने जिल्हावासियांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्याच्या विकासाला ‘ब्रेक’ लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी खनिकर्म विभागातील निधी वाटप घोटाळा पुढे आल्यानंतर आता कंत्राटदारांनी थेट जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर निधीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर ते पत्नीच्या खात्यात हे पैसे घेतात असा गंभीर आरोप देखील केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

विविध कारणांसाठी चर्चेत असलेला जिल्हा नियोजन विभाग आता कंत्राटदारांच्या गंभीर तक्रारीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही कंत्राटदारांनी १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. नियोजन विभागातील अधिकाऱ्याने कामे मंजूर करण्यासाठी पाच टक्क्यांप्रमाणे वसुली केली असून ही रक्कम पत्नीच्या बँक खात्यात स्वीकारली आहे, असा गंभीर आरोप केला आहे.

कंत्राटदार मयूर गव्हारे, पवन भांडेकर, गणेश भांडेकर, नेताजी खोडवे, भूषण सेकुरतीवार अशी तक्रारदारांची नावे आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे. तक्रारीत त्यांच्या पत्नी या खासगी शाळेत कंत्राटी शिक्षिका असून बँक खात्याचा उल्लेख आहे. पत्नीच्या बँक खात्यात पाचखेडे यांनी गडचिरोली, सिरोंचा, अहेरी येथील कंत्राटदारांकरवी पाच टक्क्यांप्रमाणे रक्कम स्वीकारल्याचा दावा केला आहे. याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीची प्रत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

‘नियोजना’वर प्रश्नचिन्ह ?

जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे हे रुजू झाल्यापासून वादात आहेत. यापूर्वी त्यांच्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती, पाठोपाठ कंत्राटी चालकांना अचानक कामावरून काढून टाकल्याने देखील त्यांच्यावर टीका झाली होती. या तक्रारींचा कंत्राटदारांच्या तक्रारीत उल्लेख आहे. आतापर्यंत कारवाई न झाल्याने आपले कोणीच वाकडे करू शकत नाही, असा आविर्भाव त्यांच्या मनात तयार झाला आहे, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विकासाच्या नियोजनावर प्रश्न उपास्थित झाले आहे. “आरोपात तथ्य नाही. ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम पाचखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी