लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत.

४ डिसेंबररोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता असल्याचे कळले. तिने सदर बाब नागपुरातील एका डिजिटल माध्यमामध्ये कार्यरत पत्रकार रविकांत कांबळे याला सांगितली. रविकांत आणि ‘ती’ची जुनी ओळख होती.

आणखी वाचा-तीनच तासात सोन्याच्या दरात उसळी… ‘हे’ आहे आजचे दर

‘त्या’ अभियंत्यांची आणि पोलीस शिपाई सुशील गवईची ओळख असल्याचे रविकांतला माहिती होते. त्यामुळे त्याने ‘कॉलगर्ल’ आणि इतर आरोपींना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत गवईकडे १० लाखांची मागणी केली. गवईनेदेखील संधी साधून पीडित अभियंत्याला प्रकरण दडपण्यासाठी १० लाख मागितले. मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक महिला फरार आहे. आरोपींना गडचिरोलीत आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.