गडचिरोली : दारुच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पती संतोष मारोती शेडमाके (४५,रा. धानापूर ता. गोंडपिपरी जि.चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारुच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा.

दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरुन आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या सहाय्याने कवेलू बाजूला सारुन आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. आरोपी पती संतोष हा सतत दारूच्या नशेत असतो. यातूनच दोघात खटके उडायचे. यापूर्वीही त्याने अशाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली. त्यावरुन चामोर्शी ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०९, ३५१ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास उपनिरीक्षक सुमेध बनसोडे करत आहेत.

यापूर्वीही केला प्रयत्न

२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.