गडचिरोली : वर्षभरापासून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील १३ जणांचे बळी घेणारा सीटी १ वाघ वन विभागाला हुलकावणी देत पुन्हा एकदा देसाईगंज तालुक्यातील एकलपूरच्या जंगलात दाखल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन महिन्यापासून या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची चमू दिवसरात्र एक करीत असून त्यांना अद्याप यश आलेले नाही.
हेही वाचा >>> चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ‘सफारी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी पर्यटकांची गर्दी
गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघाने वन विभागाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. शुक्रवारी भंडारा जिल्ह्यात एका व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर अवघ्या बारा तासात या वाघाने देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जंगल गाठले. वन विभागाला याची चुणूक लागताच त्यांनी वाघाला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, सापळ्यातील रेडकू फस्त करीत त्याने पुन्हा एकदा वन विभागाच्या नेमबाजाला हुलकावणी दिली. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. एकलपूर आणि विसोरा गावातील नागरिकांना वन विभागाकडून जंगलात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.