गडचिरोली : जिल्हाअंतर्गत विकासकामे मंजूर करण्यासाठी पत्नीच्या खात्यात पैसे स्वीकारल्याचा आरोप असलेले जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार कंत्राटदारांनी २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे यासंदर्भातील बँक व्यवहाराचा तपशील सादर केला आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी पत्नीच्या बँक खात्यात पैसे स्वीकारल्याची तक्रार १७ मार्च रोजी मयूर गव्हारे, पवन भांडेकर, गणेश भांडेकर, नेताजी खोडवे, भूषण सेकुरतीवार या कंत्राटदारांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदारांकडे पुरावे मागितले होते. २४ मार्च रोजी कंत्राटदारांनी बँक व्यवहाराचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवला, त्यात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी भवानी कॉन्ट्रोर्वेचर प्रा.लि. कंपनीच्या खात्यातून पाचखेडे यांच्या पत्नीच्या खात्यात दीड लाख रुपये तर २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संतोष बंडावार यांच्या खात्यातून १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. कंत्राटदारांनी पुरावे सादर केल्याने जिल्हा नियोजन अधिकारी पाचखेडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा गोंधळ अधिकच वाढत चालला आहे. पाचखेडेपूर्वी या पदावर असलेले खडतकर यांची सुद्धा त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीवरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पाचखेडेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

खणिकर्म अधिकाऱ्यांनंतर नियोजन अधिकारी रडारवर

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून प्रस्तावित कोट्यवधी रुपयांची कामे रद्द करुन जिल्हा खणिकर्म अधिकारी उमेश बरडे यांच्याविरुध्द खणिकर्म विभागाला अहवाल पाठवला होता, त्यानंतर बरडे यांच्याकडील पदभार काढून घेतला. यानंतर आता जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बरडेंप्रमाणे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर असून त्यांच्याविरुध्द काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.