गडचिरोली : सलग दुसऱ्या वर्षी गडचिरोली जिल्ह्याने आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीच्या (एचएमआयएस) गुणांकनात १०० पैकी ९२ गुण घेऊन राज्यात अव्वलस्थान पटकावले. पायाभूत सुविधांचा अभाव, दुर्गम, अतिदुर्गम, डोंगरपाड्यांवर दळणवळणाची अपुरी साधने असताना खडतर प्रवास करत आरोग्यसेवा पुरविण्यात येथील यंत्रणेला यश आले.
जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या कार्यप्रणालीत सुलभता व एकसूत्रता आणण्यासाठी आरोग्य सेवा व शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीचा (एचएमआयएस) वापर केला जातो. यामध्ये आरोग्य विभागाकडून केले जाणारे लसीकरण, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, तपासणी, उपचार, गरोदर माता व नवजात बालकांची तपासणी, उपचार, प्रसूती आदी विविध सेवांची नोंद केली जाते. विविध आरोग्यसेवांच्या प्रत्यक्ष कामानुसार गुणांकन केले जाते.
हेही वाचा – वर्धा : सावंगीच्या गणेशोत्सवात ‘जी २०’ परिषदेप्रमाणे रोषणाई
या प्रणालीचे अंतिम गुणांकन १९ सप्टेंबरला जाहीर झाले. यात गडचिरोलीने २०२२-२३ मध्ये अव्वल क्रमांक मिळवला. यापूर्वी २०२१-२२ मध्येही प्रथम स्थान पटकावले होते. यंदा गडचिरोलीनंतर पुणे जिल्ह्याने ९१ गुणांसह द्वितीय तर परभणीने ८९ गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. यवतमाळ चौथ्या स्थानी असून ८८ गुण मिळाले आहेत.
गडचिरोलीत खडतर परिस्थितीत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या विविध सेवांची ही पावती आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थान मिळाल्याचा अभिमान आहे. शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. अधिक दर्जेदार व उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. – डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली</p>
हेही वाचा – नागपुरातील मेयो रुग्णालयात सहा महिन्यात खुबा- गुडघा प्रत्यारोपणाचे अर्धशतक
पायाभूत सुविधांकडे हवे लक्ष
जिल्ह्याने आरोग्यसेवेत एकीकडे राज्यात प्रथम स्थान पटकावले असले तरी भामरागड, सिरोंचा यांसारख्या दुर्गम तालुक्यांत अद्यापही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना कावड करून किंवा झोळीतून दवाखान्यात नेले जाते तर कधी मृतदेह दुचाकीला बांधून न्यावा लागतो. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभपणे देता याव्यात यासाठी रुग्णवाहिका, पक्के रस्ते, मुबलक मनुष्यबळ, दर्जेदार सुविधा मिळणे गरजेचे आहे.