गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि अविकसित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजावर आधारित मोठ मोठे प्रकल्प सुरु होत असल्याने मागील काही वर्षांपासून बदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय नेत्यांनी गडचिरोलीकडे लक्ष केंद्रित केले असून खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झालेली आहे. यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष सरसावले असून गडचिरोलीचे पालकमंत्री पद आमच्याच पक्षाकडे राहणार, असा दावा स्थानिक नेते करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी गडचिरोलीचे पालकमंत्री पद म्हणजे काटेरी मुकुट समजल्या जायचे. आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवाद्यांची गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचे पालकत्व घेण्यास नेते इच्छुच नसायचे. मात्र, तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पुढाकार घेत गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले होते. त्यानंतर येथे नक्षलवादविरोधी कारवाया आणि विकास कामांना गती मिळाली. पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासारख्या मोठ्या नेत्यांनी गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती. यादरम्यान जिल्ह्यातील लोहखनिज उत्खनन आणि त्यावर आधारित प्रकल्प सुरु झाले. नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात यश मिळाले. भविष्यात गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत अनेक कंपन्या मोठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. यामुळे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारू शकतात. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी एखाद्या जिल्ह्याचे पालकत्व घेतल्याचे खूप कमी उदाहरण आहेत. मात्र, गडचिरोलीत होत असलेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस पालकमंत्री पद स्वतःकडे ठेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

हेही वाचा : हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी नक्षली ठरवण्याचा प्रयत्न – एनएसयूआय

शिंदेंच्या कार्यकाळावर नाराजी?

एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना अनेक विकास कामांसह सूरजागड टेकडीवर लोह खनिज उत्खनन सुरु झाले. कोनसरी येथे लोह प्रकल्पाचे काम देखील सुरू झाले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात बाहेरील लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने स्थानिक भाजप नेते नाराज होते. नागपूरच्या एका नेत्याबद्दल प्रशासनात देखील मोठी नाराजी होती. त्यामुळे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli guardian minister mahayuti eknath shinde shivsena devendra fadnavis bjp ssp 89 css