लोकसत्ता टीम
गडचिरोली : धनगरांना आदिवासींमधून आरक्षण देण्यात येऊ नये यासह विविध मागण्या घेऊन सकाळी दहा वाजतापासून गडचिरोली शहरात आदिवासी समाजाने चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. यावेळी भेट देण्यासाठी आलेले भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांचा आंदोलकांनी चांगलाच पाणउतारा केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील आदिवासींमध्ये सरकारबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे वेळोवेळी आंदोलनातून ही अस्वस्थता बाहेर येत आहे. अशात धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना त्यांना आदिवासींमधून आरक्षण देण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रविवारी जिल्हाभरातील दहा हजारावर आदिवासींनी गडचिरोली शहरात एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. धानोरा मार्गावरून मोर्चा काढत आंदोलकांनी इंदिरा गांधी चौकात येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आमदार डॉ. देवराव होळी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असता आदिवासी आंदोलकांनी भाजपविरोधी घोषणा देत आमदारांचा पाणउतारा केला. सोबतच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला.
आणखी वाचा-खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर, पीक उत्पादनात लक्षणीय घट येण्याची चिन्हे
काही दिवसांपूर्वी आमदार होळी यांनी मोबाईलवर झालेल्या संभाषणात आदिवासी तरुणाला तुझ्या एका मताने निवडून येतो का, असे म्हटल्याची ध्वनिफीत प्रसारित झाली होती. हा विषय देखील या आंदोलनात काढण्यात आला त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी आमदारांना चांगलेच सुनावले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन आमदार आणि एक खासदार आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत चक्काजाम सुरूच राहणार असे आंदोलकांनी जाहीर केल्याने शहरातील पूर्व वाहतूक व्यवस्था दोन तासांपासून ठप्प पडली आहे.