गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहे. २ जवान जखमी असल्याचीही माहिती आहे. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरु असून मृतांची संख्या वाढू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली होती. दरम्यान, लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जावनांनीही प्रत्युत्तर दिले. यात ३१ नक्षलवादी ठार झाले. तर २ जवान शहीद व २ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत. तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात ही कारवाई केली. चकमकस्थळ गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांतील सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविण्याची घोषणा केल्यानंतर छत्तीसगड गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु आहेत. चालू वर्षात ७० हून अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे.

नक्षलमुक्त भारतचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरक्षारक्षकांना छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठे यश मिळाले आहे. ही कारवाई करताना शहीद झालेल्या जवानांचा देश सदा ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. त्याबरोबरच ३१ मार्च २०२६च्या आधी देशातून नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्याच्या संकल्पाची पुनरावृत्ती करतो.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री