गडचिरोली : धानोरा तालुक्यातील हेटी या लहानशा गावात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास ३२ लाखांची रोकड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला कळविले असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, या रकमेशी नक्षल्यांचा संबंध असल्याची शक्यता वर्तविली जात असून पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

हेही वाचा : महागाईचा नागरिकांसह गणेश मंडळांना आर्थिक फटका, गणपतीच्या मूर्तींचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले

२३ ऑगस्टच्या रात्री धानोरा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून साईनाथ कुमरे यांच्या घरी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वात छापा टाकण्यात आला. तपासात पोते व एका डब्यातून ३२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हेटीसारख्या लहानशा गावात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने पोलिसही चक्रावले. पैसे मोजण्याकरिता पोलिसांना बँक कर्मचाऱ्यांना पाचारण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या पैशांचा आणि नक्षल्यांचा काही संबंध आहे का, हे देखील पोलीस तपासत आहेत. धानोरा तालुक्यात नक्षल चळवळीची पाळेमुळे घट्ट रोवली आहे. येथून नक्षल्यांना आर्थिक रसद पुरविल्या जात असल्याचे आजपर्यंत अनेकदा उघडकीस आले आहे. त्यामुळे ही रक्कमही नक्षल चळवळीसाठी जमा करण्यात आली होती का? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

प्राप्तिकर विभागाकडे तपास

याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. प्रकरण प्राप्तिकर विभागाशी संबंधित असल्याने त्यांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांनी ‘लोकसत्ता ’शी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli lakhs money found small village possibility naxal relations ysh