गडचिरोली : जिल्हा हिवताप विभाग प्रशासनासह पोलिसांसमोर निर्माण झालेले ‘मायक्रोस्कोप’ चोरी प्रकरणाचे कोडे अद्याप सुटले नाही. त्यामुळे या चोरीची नव्याने कार्यालयीन चौकशी करण्याचे सुतोवाच उपसंचालक आरोग्यसेवा तथा हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे. नुकतेच ते गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा हिवताप विभागाचा आढावा घेतला.
पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा हिवताप कार्यालयातून १२ जुलै २०२३ रोजी पाच लाख किमतीचे १८ ‘मायक्रोस्कोप’ यंत्र चोरीला गेले होते. सदर चोरीची तत्कालीन भांडारपाल अशोक पवार याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु दहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही पोलिसांना या चोरीचा छडा लावता आला नाही. दरम्यानच्या काळात याप्रकरणी भांडरपाल अशोक पवार याला निलंबित करण्यात आले. त्याच्यावर विभागीय चौकशीदेखील लावण्यात आली.
हेही वाचा : आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
मात्र, चोर सापडला नाही. २०२० -२१ मध्येसुद्धा या कार्यालयातून ‘मायक्रोस्कोप’ चोरीला गेले होते. त्यावेळेही चोराला पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते. रक्ताचे नमुने तपासनीकरिता वापरण्यात येणारे हे ‘मायक्रोस्कोप’ महागाडे यंत्र असून ते चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे या चोरीचे गौडबंगाल नेमके काय, हे समोर आणण्यासाठी पुन्हा एकदा कार्यालयीन चौकशी करण्यात येणार आहे. तसे सुतोवाच डॉ. पवार यानी केले आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण ‘लोकसत्ताने’ लावून धरले होते.
भांडारपालची भारमुक्तता संशयास्पद?
हिवताप विभागातून यापूर्वीही मायक्रोस्कोप चोरी गेले होते. त्यानंतर भांडार शाखेत सुरक्षेबाबत प्रभावी उपाय आवश्यक होते, पण पुन्हा पाच लाखांचे मायक्रोस्कोप चोरीस गेल्याने खळबळ उडाली. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. दुसरीकडे भांडारपाल पवार याची विभागीय चौकशी सुरु असताना भारमुक्त करण्यात आले. परीक्षा उत्तीर्ण होऊन दुसऱ्या पदस्थापनेवर त्याची नियुक्ती झाली आहे. मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक असो की इतर निर्णय जिल्हा हिवताप विभागात थेट वरून आदेश येत असतात. हे विशेष.
हेही वाचा : विकृत मानसिकतेच्या तरुणाला अखेर पोलिसांनी केले गजाआड
पोलीस तपासावर प्रश्न?
चोरी होऊन दहा महिन्याचा कालावधी लोटला, परंतु चोर पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस या प्रकारणाचा समांतर तपास करीत असल्याचे सांगतात. पण पोलीस मुख्यालयासमोर झालेल्या चोरीचा छडा मात्र त्यांना लावता आलेला नाही. एरव्ही इतर प्रकरणात तत्परता दाखविणारे पोलीस या प्रकरणात संथ का, असा प्रश्न यनिमित्ताने उपास्थित होतो आहे.