गडचिरोली : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात क्षयरोग आणि फुफ्फुसांशी संबंधित विविध आजारांचे निदान करण्यासाठी डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ संस्थेद्वारा संचालित माँ दंतेश्वरी हॉस्पिटलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. एआय तंत्रज्ञानाद्वारे २०२४-२०२५ या वर्षात माँ दंतेश्वरी हॉस्पिटलने ८८ क्षय रुग्णांचे निदान केले.
माँ दंतेश्वरी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसांशी संबंधित काही आजारांचे निदान करण्यासाठी ‘एआय’चा प्रभावीपणे वापर केला जात आहे. २०२३ पासून ही यंत्रणा वापरली जात आहे. ‘क्युअर एआय’ या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. २०२४-२५ या वर्षात या हॉस्पिटलद्वारे ८८ क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. एखाद्या रुग्णाच्या फुफ्फुसाचा एक्सरे घेतल्यानंतर तो ‘क्युअर एआय’च्या सॉफ्टवेअरवर अपलोड होतो. त्यानंतर या रुग्णाला क्षयरोग, बरगडी फ्रॅक्चर, शरीरातील सुक्ष्मदर्शक आजार, शरीरात पाण्याची कमी असण्याचा धोका किती आहे, याचा अंदाज वर्तवला जातो. रुग्णाचा अहवाल काही सेकंदात डॉक्टरांना त्यांच्या मोबाईल अॅपवर मिळतो. त्यामुळे पुढील उपचार तसेच आवश्यक त्या चाचण्या घेण्यासाठीचा निर्णय लगेच घेता येतो.
तंत्रज्ञान कसे काम करते?
डेटा हा कोणल्याही ‘एआय’च्या केंद्रस्थानी असतो. हे तंत्रज्ञान विकसित करतानाही संबंधित कंपनीने फार मोठ्या प्रमाणावर मेडिकल इमेजेस वापरल्या आहेत. मेडिकल इमेजमध्ये एक्सरे, एमआरआय आदींचा समावेश होतो. या इमेजेसमधून मिळणाऱ्या डेटातून संबंधित आजरांची शक्यता वर्तवणारे एआय’ मॉडेल विकसित करण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी कोणतेही तंत्रज्ञान विकसित करताना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभागही असतो.
लाभ कसा होतो?
गडचिरोली किंवा इतर दुर्गम भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता ही मोठी समस्या असते. तसेच आदिवासी भागात क्षयरोगाचे प्रमाणही जास्त आहे. अशा वेळी एआय सारखे तंत्रज्ञान फार उपयुक्त ठरते. टी.बी.चा जर विचार केला तर खोकलताना जो कफ (ठसा, थुंकी) बाहेर पडतो, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. हा रिपोर्ट येण्यात काही वेळ जाऊ शकतो. पण ‘एआय’मध्ये काही सेकंदात संबंधित रुग्णाला फुफ्फुसांशी संबंधित कोणता आजार असेल, याची माहिती मिळून जाते. कमी वेळात निदान झाल्याने उपचारही लवकर सुरु होतात.
माँ दंतेश्वरी हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. अश्विन राघमवर म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागात, किंवा जिथे रुग्णांची संख्या फार जास्त असते, अशा ठिकाणी रोगनिदानात ‘एआय’चा चांगला वापर होऊ शकतो. पण हे तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉक्टरांना मदतनीस अशी याची भूमिका आहे.