गडचिरोली : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या दोघा माथेफिरुंना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुमित जगदिश मंडल (१८,रा.दुर्गापूर) असे आरोपीचे नाव असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आष्टी पोलिसांच्या दहा पथकाने दोन दिवसात आरोपींना जेरबंद केले.

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहराच्या जवळ असलेल्या सोमनपल्ली या गावाच्या बस थांब्यावर २१ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि त्यापुढे अश्लील मजकूर लिहिले असल्याचे समोर आले होते. ही बाब वाऱ्यासारखी पसरताच विविध संघटनांनी सोमनपल्लीकडे धाव घेतली. यावेळी बस थांब्याच्या समोरील बाजूस हा आक्षेपार्ह मजकूर आढळून आला. यावेळी आझाद समाज पक्षाचे विवेक खोब्रागडे आणि कार्यकर्त्यांनी आष्टी पोलीस स्टेशनला धडक देत तक्रार दाखल केली. त्यांनंतर विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध नोंदवला व आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. या प्रकारामुळे तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ यावर कारवाईचे निर्देश दिले. तीन दिवस पोलिसांनी तापास करून आरोपींना अटक केली.

येत्या काही महिन्यांवर या पारिसरातील गावात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी कुणीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला होता. मात्र, आरोपी हे विकृत मनोवृत्तीचे असून यातूनच त्यांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे.

तांत्रिक तपासातून गुन्हेगार जाळ्यात

आष्टी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे १० पथक सोमनपल्ली व आसपासच्या गावामध्ये कसून तपास केला. यात एकाच काळ्या रंगाच्या शाईने इतर ठिकाणीसुद्धा अश्लील मजकूर लिहिल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व आरोपींना जेरबंद केले. यात गोपनीय माहिती व तांत्रिक तपास महत्वाचा ठरला.

Story img Loader