गडचिरोली : शेतजमीन फेरफार करून देण्यासाठी ९ हजार रुपयांची मागणी करुन ६ हजार रुपये स्वीकारणाऱ्या लाचखोर मंडळाधिकारी व तलाठ्यास २ ऑगस्टला जेरबंद करण्यात आले. ही कारवाई महागाव (ता. अहेरी) येथे २ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.
खमनचेरु येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) वर्ग ३ व व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) वर्ग ३ यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहेरी तालुक्यातील महागाव येथील एका शेतकर्‍याच्या शेतजमिनीचा फेरफार करुन सातबाऱ्यात तीन नावांचा समावेश करायचा होता. त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याने प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे तीन नावे लावण्यासाठी ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. दरम्यान, शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचमागणी पडताळणी करुन २ ऑगस्टला सापळा लावला. जल्लेवार याने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास पकडले, त्यानंतर मंडळाधिकारी भूषण जवंजाळकर यालाही ताब्यात घेतले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, किशोर जौंजारकर, अंमलदार प्रवीण जुमनाके यांनी कारवाई केली.

हेही वाचा…महिलांनो सावधान! मुनगंटीवार म्हणतात, “लाडकी बहीण योजनेसाठी मविआचे नेते चुकीचे अर्ज…”

वादग्रस्त तलाठी जल्लेवार अखेर जाळ्यात

अहेरी उपविभागात मागील काही वर्षांपासून महसूलच्या अधिकाऱ्यांकडून लहान कामांसाठी देखील नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार वाढले आहे. नाईलाजास्तव नागरिकांना लाच द्यावी लागत आहे. न दिल्यास त्रुटी काढून कित्येक महिने कामे प्रलंबित ठेवले जाते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या दोघांपैकी तलाठी व्यंकटेश जल्लेवार याची काही महिन्यांपूर्वी अहेरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याच्यावर जमीन वर्ग २ ते वर्ग १ प्रकरण, रेती वाहतूक अशा अनेक प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्याचे लाचखोरीचे प्रकार सुरूच होते. अखेर तो ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा…आई-वडील की सासू-सासरे? महिला कर्मचाऱ्यांनो, एकदाच काय ते ठरवा…

२४ तासांत दुसरी कारवाई

१ ऑगस्टला लाच मागणी केल्याप्रकरणी धानोरात बांधकाम विभागाचा कनिष्ठ अभियंता अक्षय आगळे यास अटक करण्यात आली, त्यानंतर २ ऑगस्टला अहेरीत मंडळाधिकारी व तलाठ्यास लाच घेताना पकडले. २४ तासांत एसीबीने दोन कारवायांत तिघांना जेरबंद केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli officials and talathi arrested for 6000 bribery anti corruption department takes swift action ssp 89 psg