गडचिरोली : ‘आयपीएल’ दरम्यान सुरु असलेल्या ‘ऑनलाईन’ जुगाराविरोधात गडचिरोली पोलिसांनी अहेरीनंतर देसाईगंज येथे कारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चेतन मस्के (रा. कोरेगाव ), नवीश नरळ (रा.शेगाव जि. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहे. तपासादरम्यान ३.६६ लाख इतक्या रोख रकमेसह मोबाईल व चारचाकी वाहन असे एकूण १६.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दहा वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ सट्टा खेळाला जात आहे. शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या या जुगाराच्या आहारी गेल्याने जिल्ह्यातील तरुण व नोकरवर्गावर कर्जबाजारी होऊन फिरण्याची वेळ येत आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करून हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने सर्वात आधी अहेरी येथे कारवाई करून १० जणांना अटक केली होती. त्यानंतर देसाईगंज येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील टी पॉईंट चौकात सापळा रचून एका चारचाकी वाहनाची झडती घेतली असता गाडीत ३.६६ लाख इतकी रोख रक्कम मोबाईलमध्ये ‘ऑनलाईन’ जुगाराची ‘लिंक’ आढळून आली. यावरून चेतन मस्के आणि त्याचा साथीदार नवीश नरळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी चारचाकी वाहनसह एकूण १६ लाखांचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑनलाईन जुगाराविरोधात सुरु केलेल्या धाडसत्रामुळे बुकिंचे धाबे दाणाणले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपाविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या पथकाने केली.

हेही वाचा – चंद्रपूर : महिलेला गर्भवती करून पोलीस कर्मचारी फरार

हेही वाचा – जहाल नक्षल समर्थकास अटक, दीड लाखांचे होते बक्षीस

मोठे मासे अद्याप मोकाट!

‘आयपीएल’ असो की इतर क्रिकेट सामने मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा चालतो. यात असलेली शेकडो कोटींची उलढाल बघून अनेक जण यात गुंतले आहेत. यात काही राजकीय कार्यकर्त्यांचा देखील सहभाग आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाई केवळ लहान बुकिंवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, गडचिरोली, अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, चामोर्शी आणि कुरखेडा येथील मोठे बुकी अद्याप मोकळे असल्याने त्यांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli online gambling on cricket crime against two others ssp 89 ssb