गडचिरोली : पूर्व विदर्भात हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या धान घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदाच प्रशासनाने कडक भूमिका घेत गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाचा घोटाळेबाज प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार याला निलंबित केल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, यात सहभागी गिरणी मालक व त्यांना तेलंगणातून निकृष्ट तांदूळ पुरवठा करणारा सिरोंचातील कुख्यात तस्कर ‘विरेनसेठ’ अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे प्रशासनात यांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतल्या जाते. त्यामुळे महामंडळामार्फत ते धान विकत घेऊन प्रशासन करारपात्र भात गिरणींना भरडाईकरिता देतात. तेथून ते तांदूळ स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना वाटप करतात. परंतु या प्रक्रियेमध्ये मागील काही वर्षांपासून गैरप्रकार होत असून यामाध्यमातून माफियांकडून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात येत आहे. याप्रकरणी प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने कोटलावार यांच्या कार्यपद्धतीवर अक्षेत घेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. त्यात भात गिरणीमध्ये विद्युत जोडणी झाली नसतानाही भरडाईचा करारनामा करण्यात आला.

हेही वाचा : रेल्वेत मिळणार नवरात्री थाळीची मेजवानी; वाचा कुठे आणि कसे ते?

धानाची भरडाई करणाऱ्या गिरणी मालकांना बँक गॅरंटीपेक्षा जादा डीओ देणे, राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरेंटी न घेता सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे. धान भरडाईच्या तुलनेत विजेचा वापर, अशा अनेक गैरप्रकारात कोटलावार यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच ४२ गिरणींचा चौकशी अहवाल देखील जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. या अहवालात बहुतांश गिरणी मालकांवर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला असून आता त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घोटाळ्याचे ‘कनेक्शन’ तेलंगणा सीमेला लागून असलेला सिरोंचा तालुक्यापर्यंत असून तेलंगणातून येथे स्थायिक झालेला तांदूळ तस्कर ‘विरेनसेठ’ यामागचा मुख्य सूत्रधार आहे.

हेही वाचा : ठाकूर बंधूंनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले; ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात १२ कोटींचे फसवणूक प्रकरण

शहरापासून काही अंतरावर आसरल्ली मार्गावर या तस्करीचे केंद्र आहे. वनविभागाच्या जागेवर अवैधपणे कब्जा करून या विरेनने तेथे गोदाम उभे केले आहे. तेलंगणातील स्वस्त धान्य केंद्रात वाटप करण्यात येत असलेला २ ते ३ रुपये किलोचा शेकडो टन तांदूळ अवैधपणे येथे आणले जाते. मग बनावट परवाने तयार करून गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील गिरणी मालकांना या तांदळाचा पुरवठा केला जातो. मागील काही वर्षापासून हा गोरखधंदा जोमात सुरू आहे. या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात येत आहे. पूर्ण जिल्ह्यात या प्रकाराची चर्चा असताना प्रशासनाकडून कधीच कारवाई करण्यात येत नाही, हे विशेष.

हेही वाचा : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि क्षणात कोळसा झाला, नेर येथील घटनेने खळबळ

कारवाई टाळण्यासाठी नेत्यांची धडपड

धान घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील काही नेते यातील मुख्य आरोपींना वाचविण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. कोटलावार यांच्यावर कारवाई करू नये यासाठी या नेत्यांनी अधिकाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता याची झळ गिरणी मालकांपर्यंत पोहोचू नये यासाठी या नेत्यांनी धडपड चालू केल्याचे समजते. त्यामुळे घोटाळेबाज गिरणीमालक आणि कुख्यात तांदूळ तस्कर ‘विरेनसेठ’ निश्चिंत असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli paddy scam officer suspended but who is saving mill owner and rice smuggler involve in scam ssp 89 css
Show comments