गडचिरोली : कांकेर-गडचिरोली सीमाभागातील पोलीस ठाण्यावर पाळत ठेऊन मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. चैनुराम उर्फ सुक्कु वत्ते कोरसा ( ४८, रा. टेकामेट्टा छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. शुक्रवारी मध्यरात्री गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने ही धाडसी कारवाई केली.
शुक्रवारी गडचिरोली पोलिसांना छत्तीसगड सीमेवरील जारावंडी-सोहगाव जंगल परिसरात संशयास्पद व्यक्ती पाळत ठेऊन असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. यावरून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तात्काळ पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाला त्याभागात पाठवून अभियान राबविले. दरम्यान, जारावंडी ते सोहगाव मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळ चैनुराम हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो जारावंडी व पेंढरी पोलीस पथकावर पाळत ठेऊन काही दिवसात मोठा घातपात घडवून आणण्याचा तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही वाचा : विभागीय बैठकीत गोंधळ घालणारे नरेंद्र जिचकार यांच्या हकालट्टीचा शहर शिस्तपालन समितीचा ठराव
चैनुराम हा २६ जून २००० मध्ये नक्षलवाद्यांच्या पर्लकोटा दलममध्ये भरती झाला. २००३ मध्ये त्याच्यावर नक्षल्यांच्या विभागीय समितीच्या सहायक सदस्य पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनतर २००३ ते २०१४ पर्यंत तो नक्षल्यांच्या नंदनवन समजल्या जाणाऱ्या ‘माड’ विभागाच्या समितीत सदस्य म्हणून कार्यरत होता. काही दिवस त्याला सहायक सदस्य पदाची जबाबदारी दिल्यानंतर २०१६ पुन्हा त्याला साहित्य पुरवठा विभागाच्या समितीत उप-कमांडर पदावर बढती देण्यात आली. तेव्हापासून तो सीमाभागात कार्यरत होता. त्याच्यावर सात चकमकी व २०१० मध्ये नारायणपूर येथे एका व्यक्तीच्या खुनात सहभागी असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एकूण १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, यतीश देशमुख, कुमार चिंता उपस्थित होते.
हेही वाचा : मानवी तस्करी, गुलामगिरीविरोधात यवतमाळात ‘वॉक फॅार फ्रिडम’
भामरागड परिसरात स्पोटकाचा पुरवठा
अटक करण्यात आलेला नक्षलवादी चैनुरामवर सीमाभागात कार्यरत दलमला स्फोटके व इतर साहित्य पुरविण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात तो अधिक सक्रिय होता. मागील वर्षभरात त्याने या भागातील नक्षल्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटके पुरविल्याची माहिती चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.