गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

९ मार्चला गडचिरोली पोलीस दलाने छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या कवंडे येथे पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली. शनिवारी कवंडे येथील पोलीस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलीस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली. शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला.

त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंदार शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

कवंडेत नुकतेच पोलीस केंद्र स्थापन

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे. यातील भामरागड तालुक्यात येत असलेल्या नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदवन म्हणून ओळखल्या जायचे. मात्र, गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते, मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे.

कवंडे येथून जवळ असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे. हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे नदीवरील पुलाचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. कवंडे येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना झाल्याने लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे नेलगुंडापासून कवंडेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. जवानांनी २४ तासात रस्ता बनवून सर्व साहित्य नेले.