गडचिरोली : Gadchiroli police force naxalite arrested खून, जाळपोळ, दरोडा अशा विविध प्रकरणात २३ गुन्हे दाखल असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. साधू ऊर्फ संजय नरोटे (३१ रा. झारेवाडा ता. एटापल्ली) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.
सोमवारी गोपनीय माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पथक व केंद्रीय राखीव पोलीस जवानांनी गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात अभियान राबवले होते. दरम्यान, जंगलात लपून बसलेल्या संजय नरोटे या नक्षल्याला जवानांनी अटक केली. संजय २०१५ मध्ये नक्षल चळवळीत दाखल झाला होता. त्याच्यावर ८ खून, १२ चकमकीत सहभागी असल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल होते. शासनाने त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात सध्या ९४ नक्षलवादी सक्रिय आहेत. त्यातील ५० टक्के नक्षल छत्तीसगड राज्यातील आहे. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यातिश देशमुख, कुमार चिंता उपस्थित होते.