गडचिरोली : गुरुवारी १८ जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आल्याने महामार्गाच्या बांधकामावरील जेसीबीच्या खोऱ्यात बसून एका गर्भवती महिलेला नाला ओलांडावा लागला. १९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आलापल्ली- भामरागड महामार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे दुर्गम, अतिदुर्गम भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेवरी संदीप मडावी (२२,रा. कुडकेली ता.भामरागड) असे महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती. मात्र, १९ जुलैलाच सकाळी प्रसववेदना सुरु झाल्या. त्यामुळे सुमदाय आरोग्य अधिकारी व परिचारिका रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या. वाटेत मोठा नाला लागला. १८ रोजी जोरदार पाऊस झालेला असल्याने या नाल्यातून पाणी वाहत होते, त्यामुळे रहदारी अशक्य होती. रुग्णवाहिका पुढे नेता येत नसल्याने शेवटी जेसीबीच्या खोऱ्यात महिला व तिच्या पतीला बसवून पैलतिरी सोडण्यात आले. आलापल्ली- भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.१३० डी) सध्या बांधकाम सुरु आहे. या नाल्यावर बांधकामासाठी जेसीबी होता, त्यात बसून नाला ओलांडल्यानंतर जेवरी मडावीला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसाळ्यात दरवर्षी या परिसरात नागरिकांना रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

हेही वाचा – दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”

राष्ट्रीय महामार्ग विभागाचा भोंगळ कारभार

आलापल्ली ते भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग दक्षिण गडचिरोलीतील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत न केल्याने व तात्पुरते मार्ग मुसळधारपावसाने वाहून गेल्याने नागरिकांचे हाल सुरु आहेत. त्यातच गर्भवती महिलेलाही याचा फटका बसला. धीम्या गतीने सुरु असलेले काम, पर्यायी पूल वाहून गेल्याने वारंवार तुटत असलेला संपर्क यामुळे कंत्राटदाराला जाब विचारणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – Wardha Rain News: अखेर सुट्टी मिळाली…पण केवळ ‘याच’ तालुक्यांना…

“दुर्गम, अतिदुर्गम भागातील गर्भवतींसाठी ट्रॅकिंग सिस्टीम आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेला आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. या महिलेस प्रसव वेदना सुरु झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात हलविले, पण नाल्याला पाणी असल्याने जेसीबीच्या खोऱ्यात बसवून पैलतिरी न्यावे लागले. सध्या उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.” – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली</p>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli pregnant woman crossed a canal sitting in a jcb due to bad roads lives of the citizens of bhamragad taluka in danger ssp 89 ssb