गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा गावाजवळच्या शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला आज दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास वाघाने ठार केले. शारदा महेश मानकर (२६) रा. कुरखेडा, ता. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. शारदाला एक ३ वर्षांचा मुलगा असून, ती ८ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती आहे.

मानकर यांचे शेत कुरखेडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून, ते खंड क्रमांक ४११ मधील जंगलाला लागून आहे. मानकर यांच्या शेतातील धानाचे चुरणे नुकतेच आटोपले. त्यामुळे खळ्यावर राहिलेले धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर ही शेतावर गेली होती. धान पाखळत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच गतप्राण झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारच्या शेतातील महिला धावून आल्या. मात्र, तोपर्यंत वाघाने पोबारा केला.

हेही वाचा – क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार

हेही वाचा – भूखंड लिलाव विक्री प्रक्रियेच्या निविदेला पंधरा दिवसांची मुदतवाढ, मोठमोठे विकासक आले पुढे

घटनेनंतर चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संध्याकाळी उशिरा मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. त्या परिसरात वाघाचा वावर असून, दवंडी देऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यात आले आहे, असे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader