गडचिरोली : संपत्तीसाठी सुपारी देऊन सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगर रचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ एमएसएमईचा संचालक प्रशांत पार्लेवार यांना कट रचण्यात देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याने मदत केली. आता अटक टाळण्यासाठी हा नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याचा माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुट्टेवार हत्याकांडात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले पुरुषोत्तम पुट्टेवार (८२, शुभनगर, मानेवाडा) यांचा २२ मे रोजी मुलीच्या घरी पायी जात असताना मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी तडकाफडकी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुरुषोत्तम त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ. मनीष, सून अर्चना व मुलगी योगिता आहे. सुक्ष्म-लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार याचा मोठा भाऊ प्रवीणची योगिता ही पत्नी असून तिने पार्लेवारच्या संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून न्यायालयीन लढा सुरु केला होता.
हेही वाचा – नांदेड, छत्रपती संभाजीनगरसाठी नागपूरहून विमानसेवा लवकरच
प्रशांत आणि त्याची बहीण अर्चना पुट्टेवार यांना योगिताला संपत्तीतील वाटा द्यायचा नव्हता. मात्र, योगिताची न्यायालयीन लढाई सासरे पुरुषोत्तम लढत होते. त्यामुळे त्यांच्या हत्याकांडाचा कट सहा महिन्यांपूर्वीच देसाईगंज येथील काँग्रेस नेत्याच्या घरी रचला होता. प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा नेता भूमिगत असून कारवाईपासून वाचण्यासाठी राज्यातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही भूमाफिया सहभागी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भूमाफियांवर संशय?
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी सून अर्चना पुट्टेवार ही मागील तीन वर्षांपासून गडचिरोलीत नगर रचना विभागात सहायक संचालक पदावर कार्यरत होती. यादरम्यान, तिने शेकडो कोटींचे भूखंड अवैधपणे अकृषक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्यात ती जिल्ह्यातील काही भूमाफियांच्या संपर्कात होती. त्यापैकी देसाईगंज आणि अहेरी येथील तिच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे यातील काहींवर पोलिसांना संशय असल्याचे कळते.
हेही वाचा – निवडून येताच प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, आता नवीन जबाबदारी
दोनदा रचला कट
पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यावर आतापर्यंत दोनदा अपघातात ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन्ही घटनेतून पुरुषोत्तम थोडक्यात बचावले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा अपघाताचा बनाव करून पुरुषोत्तम यांचा खून करण्यात आला. या सर्व बाबींमध्ये अस्पष्टता असल्यामुळेच सध्या कारागृहात असलेल्या अर्चना पुट्टेवार हिला पोलीस पुन्हा ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. आरोपी बहीण भावाला समोरासमोर बसवून चौकशी केल्यास आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांच्या संपर्कात असलेल्यांचे धाबे दाणाणले आहेत.