गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला हादरावून सोडणाऱ्या शिवणी अत्याचार प्रकरणातील आरोपीला ४ मार्चरोजी रात्रीला उशिरा अटक करण्यात आली. पीडितने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी तपास केला होता. अटक केल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. अनिल संतू उसेंडी ( २३, रा. दोबे , ता. ओरछा , छत्तीसगड) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने शौचासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणीला एकटी गाठून फरफटत नेले, अमानुष मारहाण केली व नंतर अत्याचार केला. बेशुद्धावस्थेत सोडून पळून गेला. अंगावर शहारे आणणारी ही घटना तालुक्यातील शिवणी गावात २ मार्चला रात्री घडली. तरुणीची अब्रू लुटण्यासाठी आरोपीच्या अंगात जणू सैतान संचारला होता. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून जखमी तरुणीवर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
चामोर्शी मार्गावरील वाकडीनजीकच्या शिवणी गावातील २३ वर्षीय तरुणी २ मार्चला सायंकाळी सहा वाजता ती शौचासाठी गावालगत उघड्यावर गेली होती. तासाभरानंतरही ती परत न आल्याने कुटुंबीयाने शोध घेतला असता शौचास गेलेल्या ठिकाणापासून २० मीटर अंतरावर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या हाताला जखम होती शिवाय डोळ्याखाली दगड किंवा विटाने मारहाण केल्याचे व्रण होते. दरम्यान, कुटुंबीय व ग्रामस्थांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला ३६ तासात जेरबंद केले. आरोपी हा लगतच्या छत्तीसगड राज्यातील असून मजुरीचे काम करायचा.
तीव्र पडसाद, संघटना आक्रमक
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ३ मार्च रोजी शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख हेमंत जंबेवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन दिले. ४ मार्चला वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.