गडचिरोली : कबुतर चोरल्याचा आरोप करून चार चिमुकल्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चित्रफीत समाज माध्यमावर ‘व्हायरल’ होताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे. ६ ऑगस्टरोजी आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे राम मंदिर परिसरात चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीची चित्रफित समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या चित्रफितीत एक अल्पवयीन आरोपी चार चिमुकल्यांना बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. आरोपीच्या वडिलांची देसाईगंज येथे रक्त तपासणी प्रयोगशाळा असून तो अल्पवयीन आहे. या अल्पवयीन आरोपीने पीडित चिमुकल्यांवर कबुतर चोरल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांड्याने मारताना व जवळ असलेल्या सळाखीवर त्या चिमुकल्यांना उचलून फेकून दिले.

हेही वाचा – नागपूर : अपघातात डॉक्टरचा जीव गेला, घटनेच्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठाला अखेर…..

चित्रफितीत एक प्रौढ व्यक्तीसुद्धा चिमुकल्यांचा बचाव करताना दिसत आहे. परंतु, आरोपी त्याचे काहीही न ऐकता चिमुकल्यांना बेदम मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या तब्बल पंधरा दिवसांनंतर चित्रफित सार्वत्रिक होताच देसाईगंजमध्ये संतापाची लाट उसळली.

५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पीडित बालकांचे आई-वडील, नातेवाईक व नागरिक आरोपीच्या कस्तुरबा वार्डातील घरापुढे गोळा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी जमावाला शांत करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

गुन्ह्याच्या वेळेस आरोपी अल्पवयीन

या घटनेतील आरोपीने ४ ऑगस्ट रोजी वयाचे अठरा वर्षे पूर्ण केले आहे. मात्र, ही मारहाण झाली तेव्हा तो अल्पवयीन होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २० जुलै रोजीची आहे. त्यामुळे आरोपीची बाल गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – एमपीएससीकडून महत्त्वाच्या सूचना जाहीर, उमेदवारांनी पर्याय बदलताना….

ही घटना २० जुलै रोजीची असून पाच तारखेला चित्रफित सार्वत्रिक झाल्यानंतर उघडकीस आली. पीडित मुलांनी देखील त्याबद्दल कुठे वाच्यता केलेली नव्हती. गुन्ह्याच्या वेळेस आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची विधीसंघर्षग्रस्त म्हणूनच नोंद करण्यात आलेली आहे. – अजय जगताप, पोलीस निरीक्षक, देसाईगंज