गडचिरोली : महाराष्ट्र सीमेपासून ४० किमी अंतरावर छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील ‘करेगुट्टा’ टेकडीवर दहा हजार जवानांनी पहाडीवर एक हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे. २३ एप्रिलपासून सुरु असलेल्या चकमकीत जवळपास सात नक्षल्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे हादरलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा शांतीप्रस्ताव पुढे केला आहे. उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेशने बिजापूरमधील नक्षलविरोधी कारवाई थांबवावी व शांतीवार्ता करावी, अशी विनवणी पत्रकाद्वारे केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करु, असा निर्धार केला आहे. यानंतर छत्तीसगड, महाराष्ट्रात नक्षलविरोधी मोहीम गतिमान झालेली आहे. चारशेहून अधिक नक्षलवाद्यांचा जवानांनी विविध मोहिमांमध्ये खात्मा करुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या बटालियन क्र. १ चा कमांडर व जहाल नेता हिडमा याचा बालेकिल्ला असलेल्या ‘करेगुट्टा’ पहाडीवर २३ एप्रिलपासून जवानांनी अभियान सुरु केले आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणेतील विविध पथकांच्या तब्बल सात हजार जवानांनी पहाडीला वेढा टाकून जहाल नेता हिडमासह इतर नक्षली नेत्यांची कोंडी केली आहे. चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. माओवाद्यांविरुध्द सुरक्षा यंत्रणा अधिक आक्रमक झाल्याने उत्तर- पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याने २५ एप्रिल रोजी पत्रक जारी करुन शांतीवार्ताचा पुनरुच्चार केला आहे.

हादरलेल्या नक्षल्यांची भावनिक साद

आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी पोषक वातावरण बनवत आहोत, पण सरकारने ‘करेगुट्टा’ पहाडीवर सर्वात मोठे अभियान सुरु केले आहे. जवानांना परत बोलवावे व शांतीवार्ता करावी. सरकारने एक महिनाभर अभियान थांबवावे , त्यानंतर अनुकूल वातावरण झाल्यानंतर शांतीवार्ता केली जाईल. आम्ही सकारात्मक प्रतिक्रियेसाठी प्रतीक्षा करत आहोत, अशी भावनिक साद रुपेशने सरकारला घातली आहे. यापूर्वीही रुपेशने दोनवेळा पत्रक काढून शांतीवार्ता करावी, अशी विनवणी केलेली आहे.