गडचिरोली : आदिवासी समाजात असलेल्या ‘कुर्माघर’ प्रथेवर आधारित चित्रपटात आता आत्मसमर्पित नक्षलवादीही अभिनय करणार आहे. त्यासाठी या चित्रपटाच्या निर्मात्या अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी त्यांना संधी देण्यासाठी शनिवारी नवजीवन वसाहतीत जाऊन त्यांची ‘ऑडिशन’ घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांना मासिक पाळीदरम्यान घरात न राहता गावाच्या एका कोपऱ्यात बांधलेल्या कुर्माघर नावाच्या झोपडीत वास्तव्य करावे लागते. या प्रथेवर प्रकाश टाकणाऱ्या कुर्माघर नावाच्या चित्रपटाची निर्मिती गडचिरोलीत केली जात आहे. ‘अगडबम, टुरिंग
टॉकिज, नमस्कार जयहिंद, तुझ्या माझ्या संसाराला आणखी काय हवे’, अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या तृप्ती भोईर यांनी स्थानिक कलावंतांना या चित्रपटात संधी देण्याचे ठरविले.
हेही वाचा – नागपूर : वडिलाच्या मित्रासोबत अल्पवयीन मुलीने काढला पळ, बाळासह मुलगी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना स्वतःची नवीन ओळख मिळावी यासाठी त्यांनाही या चित्रपटात संधी द्यावी, अशी सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केली. त्यानुसार तृप्ती भोईर व विशाल कपूर यांनी शनिवारी नवजीवन वसाहतीत जाऊन आत्मसमर्पित पुरुष व महिला नक्षलवाद्यांची ‘ऑडिशन’ घेतली. यावेळी त्यांना अभिनय व आवाजाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक सागर झाडे व अंमलदार उपस्थित होते.