गडचिरोली : “निवडणूक संपली आता जावई आणि लेकीने सासरी निघून जावे, त्यांचे इथे कोणतेही काम नाही.” विधानसभा निवडणुकीत विरोधात उभ्या राहणाऱ्या भाग्यश्री हलगेकर यांना धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेला वडीलकीचा सल्ला जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मुलगी भाग्यश्री हलगेकरने बंड करून आव्हान दिल्याने अहेरी विधानसभेत वादळ उठले होते. शरद पवार गटाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम, अशी तिरंगी लढत झाली.
प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. टोकाचा राजकीय संघर्ष दिसून आला. समाजमाध्यमावर काही वादग्रस्त ‘ऑडिओ क्लिप’ सार्वत्रिक झाल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे अहेरीकडे लक्ष लागले होते. बंडखोरामुळे मतदानात झालेले विभाजन पाथ्यावर पडल्याने अनेकांचे अंदाज चुकवून अखेर धर्मरावबाबा आत्राम १६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. आत्राम यांचा पुतण्या अम्ब्रीश आत्राम आणि मुलगी भाग्यश्री यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या विजयाने धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा दाखवून दिले. विजयानंतर ते मुलगी आणि जावई पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आत्रामांनी जावई आणि मुलीला सासरी जाण्याचा सल्ला देत सर्व शक्यतांवर एकप्रकारे विराम लावला आहे.
हेही वाचा : धक्कादायक! घरातच देहव्यापाराचा अड्डा; महिलेने अल्पवयीन नात व तिच्या मैत्रिणीला…
“बाप तो बाप होता है”
यंदा पहिल्यांदाच आत्राम राजघराण्यातील तिघांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यापैकी पुतण्या भाजप बंडखोर म्हणून अम्ब्रीशराव आत्राम हे आमदार राहिले आहेत, तर भाग्यश्री आत्राम (हलगेकर) यांनी यापूर्वी गडचिरोली विधासभेतून निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत धर्मरावबाबांनी “बाप तो बाप होता है” हे सांगून विरोधकांचे तोंड बंद केले, अशी चर्चा अहेरी मतदारसंघात आहे. दुसरीकडे, भाजप नेतृत्वाने बंडखोरी केलेल्या अम्ब्रीश आत्राम यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खदखद आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर तरी कारवाई करणार का, असा प्रश्न अजित पवार गटाकडून उपस्थित करण्यात येत आहे.