गडचिरोली : ओडिशाहून स्थलांतरित झालेल्या रानटी हत्तींनी गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्याला आपला अधिवास बनविला आहे. या हत्तींनी गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी तीन ते चार गावांमध्ये धुमाकूळ घालत तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. यातील एकीला उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. सुशीला टेमसू मेश्राम (४२), योगिता उमाजी मेश्राम (४०), पुष्पा निराजी वरखेडे (४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

मागील आठवडाभरापासून गडचिरोली वन विभागातील वाकडी, हिरापूर, मसली, कृपाळा गावात रानटी राणी हत्तींनी आपले बस्तान मांडले आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी कृपाळा येथील १०-१२ महिला गावानजीकच्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेवढ्यात जवळपास १८ ते २० हत्तींचा कळप त्याठिकाणी पोहोचला. यातील काही हत्तींनी महिलांवर हल्ला केला. सुशीला मेश्राम या महिलेला हत्तीची धडक लागल्याने तिला मुका मार लागला. तिला नागपूरला हलविण्यात आले आहे.

अन्य दोघी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवाय हत्तींनी वाकडी येथील माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या तीन एकर शोतातील उन्हाळी धानपिकाची नासधूस केली. शिवाय म्हसली येथील यरावंत झरकर यांच्या शेतातील शेड उद्ध्वस्त केले. तसेच हिरापूर येथील तीन ते चार शेतकऱ्यांच्या पिकांचीही नासधूस केली. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ रानटी बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

‘महिलांवर हत्तींनी कशाप्रकारे हल्ला केला, याबाबत चौकशी केली जाईल. सध्या महिलांवर योग्य उपचार करण्यावर वनविभागाकडून भर दिला जात आहे. हत्तींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

मिलिश शर्मा, उपवनसंरक्षक, वन विभाग गडचिरोली