गडचिरोली : शहराजवळ असलेल्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त अधिकारी महिलेची खलबत्त्याचा रॉड मारुन हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (६१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकारणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. घराचे सर्व दरवाजे उघडे होते. शिवाय टीव्हीही सुरु होता. घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यांनी कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चामोर्शी मार्गावरील एका पेट्रोल पंपवर काम करणारा कल्पना उंदिरवाडे यांचा जावईदेखील घरी पोहचला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि त्यांचे सहकारी घटनेचा तपास करीत आहेत.
सहकारी बँकेविरुद्धच्या आंदोलनात सहभागी
कल्पना उंदिरवाडे आणि त्यांचे पती केशव उंदिरवाडे दोघेही जिल्हा परिषदेत नोकरीवर होते. केशव उंदिरवाडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले, तर कल्पना तीन वर्षापूर्वी निवृत्त झाल्या. त्यांना एक मुलगी आणि एक दत्तक मुलगा असल्याचे सांगितले जाते. मुलाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते, अशी माहिती आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत अनियमितता झाल्याचा आरोप करुन नियुक्ती आदेशाप्रमाणे संबंधित उमेदवारांना तत्काळ कामावर रुजू करुन घ्यावे या प्रमुख मागणीसाठी दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुशिक्षित युवक, युवती नोकरभरती संघर्ष कृती समितीने ११ व १२ एप्रिल असे दोन दिवस बॅकेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात कल्पना उंदिरवाडे यादेखील सहभागी झाल्या होत्या. कालच हे आंदोलन संपल्यानंतर आज त्यांची हत्या झाल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
अंगावरील सोनं कायम?
मृत कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बोटातील ३ अंगठ्या तशाच होत्या. शिवाय अंगावरील अन्य दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे त्यांची हत्या चोरीच्या हेतूने झाली नसावी, हे स्पष्ट होते. त्यामुळे हत्या करणारा नेमका कोण, तो जवळचा व्यक्ती तर नसावा ना, असाही संशय यानिमित्त व्यक्त केला जात आहे.