टीकाकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

बिहार विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपमधील ज्येष्ठांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर थेट शरसंधान केल्यानंतर मंगळवारी घायाळ झालेल्या पक्षनेत्यांनी बुधवारी गड सावरायचा प्रयत्न सुरू केला असून शहा व मोदी यांच्यावर बेजबाबदार टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केली आहे.
अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा या चार नेत्यांनी मंगळवारी पत्रक काढून, मूठभर नेत्यांच्या दावणीला पक्ष बांधण्याची गेल्या वर्षभरातील कार्यपद्धतीच बिहारमधील पराभवाला जबाबदार असल्याचे स्फोटक विधान केले होते. त्यावेळी शहा यांची पाठराखण करतानाच, ज्येष्ठांच्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू, असा सावध पवित्रा घेणारे पत्रक गडकरी यांच्यासह राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू या तिघांनी काढले होते. बुधवारी मात्र गडकरी यांनी शहा व मोदींची पाठराखण करण्याची खेळी करीत पक्षश्रेष्ठींची मर्जी मिळवण्यासाठी पुढाकार घेतला.
ते म्हणाले, बिहारमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीबद्दल मोदी आणि शहा या दोघांनाच जबाबदार धरता येणार नाही. ही पक्षाची सामूहिक जबाबदारी आहे. जे लोक बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत आणि पक्षाची प्रतिमा मलीन करीत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणीही मी अमित शहा यांच्याकडे केल्याचे गडकरी यांनी सांगितले. अडवाणी यांच्या पत्रकाबाबत विचारता गडकरी म्हणाले की, आम्ही अडवाणी यांच्याशी चर्चा करू. बिहारमधील पराभवावरून शहा हे पक्षाध्यक्षपद सोडतील, ही शक्यता त्यांनी फेटाळली. महागठबंधनची बिहारमधील ताकद वाढली आहे, असे नमूद करून, आता तेथे भाजपची ताकद वाढवण्यावर आमचा भर हवा, असे ते म्हणाले. बिहारच्या निकालामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधी पक्ष संघटित होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
दरम्यान बिहार सरकार स्थापनेची प्रक्रिया शनिवारी सुरू होणार आहे. शनिवारी महागठबंधन विधिमंडळ पक्षाची दुपारी बैठक होईल. त्यात नेत्याची निवड होईल असे नितीश कुमार यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.

संवाद आणि विश्वासाच्या अभावाचे हे लक्षण!

भाजपमधील ज्येष्ठांना जाहीर पत्रक काढून नाराजी व्यक्त करावी लागते, हे पक्षातील संवाद आणि विश्वास खालावल्याचेच लक्षण आहे, असे मत पक्षापासून दुरावलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते गोविंदाचार्य यांनी व्यक्त केले आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानातून या चार नेत्यांचे पत्रक जारी करण्यात आले तेव्हा आपणही तेथे होतो, ही गोष्ट मात्र त्यांनी फेटाळली. त्या पत्रकाशी माझा दूरान्वयानेही संबंध नाही. मी केवळ दिवाळी शुभेच्छा द्यायला जोशी यांच्याकडे गेलो होतो, असे ते म्हणाले. पत्रकाऐवजी पक्षनेत्यांनी परस्परांशी चर्चा केली पाहिजे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. कॅमेऱ्यासमोर नव्हे तर परस्परचर्चेत प्रश्न सुटावेत, असेही गोविंदाचार्य म्हणाले.

पराभव होतो तेव्हा सर्वचजण चुकांचा आढावा घेण्याची मागणी रेटतात, पण विजय होतो तेव्हा त्याची कारणे शोधायला कुणी सांगत नाही.
– नितीन गडकरी

Story img Loader