नागपूर : बडकस चौकातील केशवची चहाची टपरी म्हणजे विविध राजकीय पक्षातील नेत्यांसह सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील लोकांचा चहाचा आस्वाद घेत भेटीगाठी घेण्याचा आणि गप्पा मारण्याचा कट्टा. या कट्टावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि प्रचारकसुद्धा चहाच्या टपरीवर येऊन चहाचा आस्वाद घेत असतात.
केवळ महालात नाही तर विदर्भात चर्चा असलेली महाल परिसरातील बडकस चौकातील केशवच्या चहाची टपरी सकाळी सहा वाजता सुरू होते ती रात्री १० वाजेपर्यंत सुरू असते आणि या ठिकाणी दिवसभर पाचशे ते सहाशे लोक या ठिकाणी चहाचा आस्वाद घेत असतात. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, आमदार प्रवीण दटके, गिरीश व्यास, रवी भुसारी, संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते या परिसरात आले की हमखास या ठिकाणी येऊन चहाचा आस्वाद घेत असतात. चहाचा आस्वाद घेत विविध विषयांवर गप्पाही रंगतात.
हेही वाचा – नागपूर: पोलीस निरीक्षकाच्या सतर्कतेने वाचले महिलेचे प्राण
गडकरी यांच्या महालातील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेली केशवची चहाची टपरी आता केवळ नागपुरात नाही तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. देवेंद्र फडणवीस महालात आले की केशवच्या चहाच्या टपरीवर येऊन चहाचा आस्वाद घेत असतात. शिवाय जवळच संघाचे मुख्यालय असल्यामुळे या ठिकाणी बाहेर गावावरून येणारे प्रचारक, स्वयंसेवक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे ही केवळ चहारी टपरी नाही तर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांचा एक कट्टा झाला आहे.