नागपूर : चिंचभवन, मिहान पुनर्वसन वसाहतीकडून नागपूर शहरात येण्यासाठी ओलांडावा लागणारा चिंचभवन चौक अनियंत्रित वाहतुकीमुळे धोकादायक ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या चौकात भरधाव येणारी वाहने आणि स्थानिकांद्वारे रस्ता ओलांडण्याची कसरत जीवघेणी ठरत आहे.
नागपूर ते वर्धा, नागपूर ते चंद्रपूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जडवाहनांसोबत मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहनांची वर्दळ असते. तसेच या भागात शाळा, महाविद्यालये, मिहान-सेझ, एम्स, आयआयएमसारख्या प्रसिद्ध संस्था आहेत. त्यामुळे साहजिकच या रस्त्यावर मोठी रहदारी असते. चिंचभवन, खापरी येथे वाढती लोकसंख्या, अनेक रेस्टॉरंट्स, तेल डेपो आहेत. याच मार्गावर खापरी-चिंचभवन रेल्वे उड्डाण पुलावरून उतरल्यानंतर लगेच चिंचभवन चौक आहे.
या चौकात वाहनांची वर्दळ आणि अनियंत्रित वाहतूक यामुळे येथे वाहनांची गती तर मंदावतेच, परंतु चिंचभवन, खापरी आणि मिहान पुनर्वसन वसाहतीमधील नागरिकांची चौक ओलांडताना मोठी अडचण होते. चिंचभवन, मिहान पुनर्वसन रस्त्यांच्या एका बाजूला आणि मेट्रो स्टेशन दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर ये-जा करण्यासाठी हा चौक ओलांडण्याशिवाय पर्याय नाही.
तसेच या वसाहतीमधील नागरिकांना नागपूर शहरात येण्यासाठी या चौकातून यावे लागते. असे असतानाही चौकात पुरसे सुरक्षा उपाय करण्यात आलेले नाही. या चौकात वाहतूक सिंग्नल आहेत. परंतु ते सुरू राहिल्यास वाहनांची मोठी रीघ लागते. त्यामुळे ते बंद ठेवणे वाहतूक पोलीस पसंत करतात. वाहतूक पोलीस तैनात नसतो. परिणामी या भागातील नागरिकांना हा चौक जीव मुठीत घेऊन ओलांडावा लागत आहे.
प्रस्तावित उड्डाण पुलाचा लाभ काय?
नारायणा आणि मोंट फोर्ट शाळेतील सुमारे १०० बसेस सकाळी ७ ते ९ वाजता आणि दुपारी १ ते ५ या वेळेत चिंचभवन चौकातून ये-जा करतात. पुलावरून वेगाने येणारी वाहने चौकात करकचून ब्रेक लावतात. आता चिंचभवन ते बुटीबोरी उड्डाण उभारण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, या उड्डाण पुलाचा या चौकाला काहीच फायदा नाही. कारण, हा उड्डाण पूल चौकाच्या समोरून सुरू होत आहे. प्रस्तावित उड्डाण पूल झाल्यावर बुटीबोरीकडून येणारी आणि नागपूरहून बुटीबोरीकडे जाणारी वाहने या चौकात उतरतील. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. त्यावर उपाय म्हणजे चिंचभवन रेल्वे उड्डाण पूल आणि प्रस्तावित उड्डाण पूल जोडावे लागणार आहे. सोबत दोन्ही बाजूच्या उड्डाण पुलास चिंचभवन चौकाजवळ लँडिंग दिल्यास हा प्रश्न काही सुटण्याची शक्यता आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्ता ओलांडण्यासाठी दहा-बारा मिनिटे
या चौकात दुपारी साडेतीन ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मोठी गर्दी असते. कधी-कधी एवढी वाहतूक कोंडी असते की, रस्ता ओलांडण्यासाठी दहा-बारा मिनिटे लागतात. या भागात नारायणा स्कूल, माऊंट फोर्ट स्कूल आहे. या शाळांच्या बसेस एकाचवेळी निघतात. एकदम ३० ते ३५ बसेस निघाल्यानंतर कोंडी होते.
हा चौक म्हणजे मोठी डोकेदुखी झाली आहे. किमान वाहतूक सिग्नल तरी पाहिजे. – माधुरी तेलरांधे
चौकातील वाहतूक कोंडीत भर
या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. परंतु, ज्या चौकातून रस्ता ओलांडावा लागतो. तेथून दोन्ही स्टेशन लांब आहेत. त्यामुळे चिंचभवनच्या लोकांना मेट्रोचा फारसा फायदा नाही. साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनला शिवणगाव फाट्यापर्यंत जावे लागते आणि खापरी मेट्रो स्टेशनही येथून लांब आहे. आधीच चौक ओलांडताना अपघाताची भीती आहे आणि त्यातही मेट्रो स्टेशनचे अंतरही पायी चालण्यासारखे नाही. या दोन्ही मेट्रो स्टेशनवर चिंचभवन चौकातून रस्ता पार करून जाणे अडचणीचे ठरत आहे. या चौकात बसेसही थांबतात व चौकातील वाहतूक कोंडीत भर घालतात.