बुलढाणा : विदर्भपंढरी शेगावमध्ये आज गुरुपौर्णिमा सोहळा रंगला असताना दूरवरच्या श्री क्षेत्र पंढरपूर येथून आज गजानन महाराज संस्थानच्या पालखीने स्वगृही म्हणजे शेगावनगरीकडे प्रस्थान केले. तब्बल साडेपाचशे किलोमीटरचा परतीचा खडतर प्रवास करून तीन ऑगस्टला ही वारी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करणार आहे. अकरा ऑगस्टला पालखी स्वगृही शेगावात डेरेदाखल होणार आहे. आज रविवारी, २१ जुलैला पहाटे तीन वाजता गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपूर येथून श्रींची पालखी पहाटे ३ वाजता काल्याच्या कीर्तनाकरीता गोपाळ पुरी येथे रवाना झाली. श्री गजानन महाराज संस्थानची पालखी पंढरपूरला आषाढ एकादशीसाठी सातशेच्यावर वारकऱ्यांसह १५ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचली. १५ ते २० जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होती. आज पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला. आज सकाळी श्रींची काकडा आरती झाली. नंतर श्रींचा अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाई दर्शन परिक्रमा करून गोपाळपुरा येथे श्रीहरीचे काल्याचे किर्तन पार पडले. यानंतर गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपूर येथून सकाळी श्रींची पालखी परतीच्या पायदळ वारीस आंरभ झाला. हेही वाचा - गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू “पंढरीच्या राया प्रभू दिनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही,” असे मनोमन म्हणत शेगावीचा राणा आणि वारकरी शेगावकडे निघाले. श्रींच्या पालखीचा शेगावसाठी परतीचा प्रवास २१ जुलै रोजी पंढरपूर येथून सुरू झाला. परतीच्या प्रवासादरम्यान २१ जुलै रोजी पहिला मुक्काम करकंब, २२ जुलै कुईवाडी मुक्काम, २३ ला उपळाई स्टेशन मुक्काम, २४ ला भगवान बार्शी येथे मुक्काम, २५ ला भुम मुक्काम, २६ ला. चौसाळा मुक्काम, २७ ला. पाली मुक्काम, २८ ला बीड मुक्काम, २९, ला. गेवराई मुक्काम, ३० ला.शहापूर मुक्काम, ३१,ला लालवाडी येथे गजानन महाराजांची पालखी मुक्कामी राहणार आहे. १ व २ ऑगस्टला, जालना मुक्काम राहणार आहे. जिल्ह्यात प्रवेश कधी? ३ ऑगस्टला शेगावची पालखी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करणार आहे. राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेडराजा या ऐतिहासिक नगरीत पालखीचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम राहणार आहे. यानंतर ४ ऑगस्टला बिबी (तालुका लोणार) मुक्काम, तर ५ तारखेला सरोवर नगरी लोणार येथे पालखी मुक्कामी राहील. ६ ऑगस्टला सारंगधर नगरी मेहकरमध्ये मुक्काम तर ७ तारखेला जानेफळ मुक्काम राहील, ८ ऑगस्टला खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने मुक्काम, ९ ला आवार मुक्कामी राहील. १० ला खामगाव मुक्काम राहणार आहे. अंतिम टप्प्यातील ११ ऑगस्ट रोजीच्या खामगाव ते शेगाव वारीत बुलढाण्यासह इतर जिल्ह्यांतील हजारो भाविक, वारकरी सहभागी होतात. ११ ऑगस्टला सकाळी ११ वाजेपर्यंत पालखी शेगाव येथे दाखल होणार आहे. हेही वाचा - अमरावती : समाज माध्यमावर प्रेमाची साद; तरुणाने केला महिलेचा ऑनलाइन पाठलाग… ‘तेराशे’चा फेरा दरम्यान शेगाव संस्थानाच्या पंढरपूर आषाढी एकादशी पायदळ वारीचे यंदा ५५ वे वर्ष आहे. शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव असा तेराशे किलोमीटरचा हा खडतर प्रवास आहे. जाण्यायेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र यात सहभागी शेकडो वारकऱ्यांचा उत्साह कायम राहतो.