बुलढाणा : कमीअधिक तेराशे किलोमीटरचा प्रवास करून आषाढी एकादशीच्या वारीवरून परतनारी संत गजानन महाराज पायदळ आषाढी दिंडी आज स्वगृही शेगावात परतली. दरम्यान आज सकाळी खामगावमधून प्रस्थान करणाऱ्या दिंडीत जिल्ह्यासह विदर्भातील भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.
२५ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. तेथून ३ जुलैला परतीचा प्रवास सुरू करणारी पालखी काल रविवारी खामगाव नगरीत दाखल झाली. आज पालखी ए के नॅशनल हायस्कुलमध्ये मुक्कामी राहिली. परतीच्या प्रवासातील गजानन माऊलीचा हा शेवटचा मुक्काम होता.
हेही वाचा – आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचे; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…
भक्तही होते मुक्कामी
आज सोमवारी सकाळी पालखीने शेगावकडे प्रयाण केले. प्रापंचिक वा अन्य कारणांमुळे पंढरपूरला जाऊ न शकणारे भाविक खामगाव ते शेगाव दरम्यान वारीत सहभागी होतात. यासाठी दूरवरचे भाविक काल खामगावात मुक्कामी होते. पावसाची वा हवामान खात्याच्या इशाऱ्याची तमा न बाळगता हजारो आबालवृद्ध भाविक वारीत सहभागी झाले. ही पालखी शेगावात दाखल झाली. संस्थानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आतिथ्य स्वीकारून गजानन महाराज वाटीकेत विश्रांती, भोजनासाठी विसावली.