बुलढाणा: विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथील गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू आहे. ही पालखी १६ जुलै रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजातून विदर्भात प्रवेश करणार आहे.
आषाढी वारीवर गेलेली गजानन महाराज पालखी तीन दिवस पंढरपूरमध्ये मुक्कामी होती. यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. कमीअधिक १३०० किलोमीटरचा प्रवास करून १६ जुलै रोजी रविवारी विदर्भातील सिंदखेडराजा येथे पालखीचे आगमन होणार आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर या पालखीचे स्वागत केले जाईल. रविवारी दुपारी ३ वाजता मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर ‘श्रीं’च्या पालखीचे आगमन होणार आहे. सिंदखेडराजा नगरीच्यावतीने नगरपालिका व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आध्यात्मिक चळवळीतील मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये ‘श्रीं’च्या पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.
हेही वाचा… विधानसभेवर मंगळवारी धडकणार भूमी संघर्ष सत्याग्रह मोर्चा
१७ जुलै रोजी किनगाव राजा आगमन व बीबी येथे मुक्काम, त्यानंतर १८ जुलै रोजी किनगाव जट्टू व लोणार येथे मुक्काम, १९ सुलतानपूर, मेहकर येथे मुक्काम, २० जुलै नायगाव दत्तापूर आगमन व जानेफळ येथे मुक्काम राहणार आहे. २१ जुलै वरवंड आगमन व शिरला नेमाने येथे मुक्काम, २२ जुलै विहिगाव आगमन व आवार येथे मुक्काम, २३ जुलैला खामगाव मुक्काम नंतर २४ जुलैला स्वगृही म्हणजे शेगाव नगरीत पालखी दाखल होणार आहे.