आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. करोनामुळे गत दोन वर्षांपासून खंडित झालेली पंढरपूर पायी वारीची ‘श्रीं’च्या पालखीची परंपरा यंदा पूर्ववत झाली. संतनगरी शेगाव येथून राजवैभवी थाटात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने ७०० वारकऱ्यांसह सोमवारी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीतीमुळे संतनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर निनादला.
यंदा ५३ वे वर्ष
‘श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५३ वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून पायी वारीमध्ये खंड पडला होता. यावर्षी ही परंपरा पूर्ववत झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळी विधिवत पूजा करून पालखीने नगर परिक्रमा केली. त्यानंतर ही पालखी नागझरीकडे रवाना झाली. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी-भक्त यांची संपूर्ण व्यवस्था ‘श्री’ संस्थानकडून केली जात आहे.
असा राहील पालखीचा प्रवास
‘श्रीं’ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होईल. १२ जुलैपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहील. आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यावर १३ जुलै रोजी सकाळी ‘श्रीं’ची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ३ ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.