शेगाव : टाळ मृदुंगाच्या तालावर होणारा विठू माऊलीचा गजर, सुशोभित पालखी, अधून-मधून बरसणाऱ्या श्रावण सरी, वारीच्या अंतिम टप्प्यात सहभागी लाखावर आबालवृद्ध भाविक, गजानन भक्तांनी फुलून गेलेला मार्ग, दानशूर व्यक्ती आणि संस्थांची सेवा, अश्या थाटात आज गजानन महाराज पालखीचे स्वगृही संतनगरी शेगावात आगमन झाले. खामगाव पासून पाठलाग करणारा पाऊस शेगावात चांगलाच बरसला आणि वारकरी, लाखावर भाविक गण एकाचवेळी पाऊस आणि भक्ति रसाने ओलेचिंब जाहले!…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पृथ्वी तलावरील वैकुंठ’ अशी ख्याती असलेल्या असलेल्या पंढरपूर येथून २१ जुलैला परतीच्या प्रवासाला लागलेली संत गजानन महाराजांची पालखी आज रविवारी, ११ ऑगस्टला सकाळी शेगाव येथे परतली. या पालखीचे हजारो भाविकांसह पावसाने जोरदार स्वागत केले. संतनगरीच्या वेशीवर पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने वारकरी शिक्षण संस्था (श्री गजानन वाटीका) याठिकाणी श्रीं’च्या पालखीसमवेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा…‘वाजवा रे वाजवा, बँड वाजवा,’ काय आहे हा प्रकार?

तिथे विसावा घेतल्यावर आज दुपारी २ वाजता गजानन महाराज पालखीची नगर परिक्रमा सुरुवात होईल. वारकऱ्यांचा टाळ- मृदंगाच्या तालावर श्रीं’चा नामघोष, विठ्ठल नामाचा जयघोष हरिनामाचा नामघोष करत निर्धारित मार्गावर श्रीं’च्या पालखीचे ठिक ठिकाणी स्वागत होणार आहे. यानंतर सायंकाळी श्रीं’च्या मंदिरात पालखी सोहळा पोहोचणार आहे. दुपारी, श्रीं’ची पालखी वाटीका येथून निघून जगदंबा चौक, एम.एस.ई.बी. चौक, रेल्वे स्थानक, अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री लहुजी वस्ताद चौकातून गजानन महाराज संस्थान मंदिर परिसरात दाखल होणार आहे.

वारी मार्ग भाविकांनी फुलला

यापूर्वी आज रविवारी पहाटे साडेपाच वाजता खामगाव येथून पालखीने विदर्भ पंढरी शेगाव कडे कूच केली. खामगाव शहरातून नगर परिक्रमा करुन संतनगरीकडे मार्गस्थ झाली. खामगाव ते शेगाव या १६ किलोमीटर अंतराच्या मार्गावर राज्यभरातून आलेले लाखावर भक्त सहभागी झाले. यामुळे हा मार्ग भाविकांनी नुसता फुलून गेल्याचे दिसून आले. शेगाव, खामगाव येथील विविध सेवाभावी संस्थांकडून वाटेत श्रीं’च्या भाविकांना चहापाणी, फराळ, पेयजलाची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा…नागपुरात पोस्टर वॉर, काँग्रेसची गांधीगिरी

दोन महिन्यांच्या खडतर प्रवास

‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याचे हे ५५ वे वर्ष आहे. शेगाव संस्थानच्या पालखीने श्रीक्षेत्र पंढरपूर पायी वारीकरिता मागील १३ जून रोजी प्रस्थान केले होते. भजनी दिंडी अश्वासह ७०० च्यावर वारकरी यात सहभागी झाले होते. श्री क्षेत्र पंढरपूर येथून २१ जुलैला शेगावसाठी परतीच्या प्रवासाला निघाली. ३ ऑगस्ट रोजी पालखीने विदर्भात प्रवेश केला. मराठवाडा,विदर्भ सिमेवरील सावरगाव माळ येथे स्वागत झाल्यावर पालखी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरी, सिंदखेडराजा नगरीत मुक्कामी होती. यानंतर लोणार, मेहकर अशी मजल दरमजल करीत पालखी १० ऑगस्टला खामगाव नगरीत दाखल झाली. पालखीचा शेवटचा मुक्काम असलेल्या खामगाव येथून आज पहाटे प्रस्थान करणारी पालखी सकाळी संतनगरीत दाखल झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan maharaj s palkhi returns to shegaon amid devotee enthusiasm and rain showers scm 61 psg