लोकसत्ता टीम
बुलढाणा: ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटी चोहीकडे’ या बालकवींच्या काव्य पंक्ती सार्थ करणारे रम्य वातावरण, सकाळपासून कोसळणारा पाऊस, त्याची तमा न बाळगता जमलेली भाविकांची मांदियाळी, स्वागत आणि आदरतिथ्यासाठी सज्ज रजतनगरी अशा थाटात गजानन महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी खामगाव नगरीत आगमन झाले. श्रावनधारा आणि भक्ती रसांनी चिंब हजारो भाविकांनी पालखीचे ठिकठिकानी स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले.
३ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेली महाराजांची पालखी सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुक्यातून मजल दरमजल मारीत खामगाव तालुक्यात दाखल झाली. शिरला नेमाने येथे पहिला मुक्काम करून वाटेवरील गावांना भेट देत पालखी काल शुक्रवारी ,९ ऑगस्टला विसाव्यासाठी आवार (खामगाव) या गावी मुक्कामी होती.
आणखी वाचा-“माझ्या अटकेसाठी मविआने अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती…”, फडणवीस यांचा आरोप
आवार येथून आज शनिवारी, १० ऑगस्टला पहाटे पालखी पुढे मार्गस्थ झाली. टेंभुरणा फाटा, अकोला बायपास मार्गे निघालेल्या पालखीचे आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास रजत नगरी खामगाव मध्ये आगमन झाले. हजारो भाविक, नागरिकांसह कोसळधार पावसानेही पालखीचे स्वागत केले! आज सकाळी साडेसहा वाजेपासून खामगाव मध्ये संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस धारा अंगावर झेलत, परंपरेनुसार पालखी आणि वारकरी, ‘हनुमान व्हिटॅमिन’ मध्ये थोडा वेळ विसावले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करणारी पालखी शेवटच्या मुक्काम स्थळी म्हणजे खामगाव मधील ‘नॅशनल स्कुल’मध्ये डेरेदाखल दाखल झाली.
भाविकांचा सागर
दरम्यान उद्या रविवारी, ११ ऑगस्टला पहाटे ५ वाजताच्या सुमारास पालखी शेगाव कडे रवाना होणार आहे. वारीला न जाऊ शकणारे हजारो भाविक , राजकीय नेते ,पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यासह वऱ्हाडातील हजारो भाविक खामगाव ते शेगाव दरम्यानच्या वारीत सहभागी होतात. यामुळे १८ किलोमीटरचा हा मार्ग भाविकांनी नुसता फुलून जातो. उद्या रविवारी सकाळी नऊ वाजताच्या आसपास पालखी संतनगरी शेगावमध्ये दाखल होणार आहे.
आणखी वाचा-Monsoon Update : राज्यातील ‘या’ भागांत जोरदार, तर कुठे हलक्या पावसाची शक्यता…
विदर्भात आगमन
यापूर्वी संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी , ३ ऑगस्टला संध्याकाळी मराठवाडा मार्गे विदर्भात आगमन आले होते. शेकडो वारकऱ्यांसह आलेल्या या पालखीचे मराठवाडा आणि विदर्भ सीमेवरील सावरगाव माळ ( तालुका सिंदखेडराजा) येथे भव्य स्वागत करण्यात आले होते. यानंतर पालखीचे राजमाता जिजाऊंच्या माहेरात अर्थात, सिंदखेडराजा मध्येही पारंपारिक पद्धतीने हजारो वारकरी आणि नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले होते. विदर्भातील पालखीचा पहिला मुक्काम सिंदखेडराजा मधील जिजामाता विद्यालयात होता. यानंतर सिंदखेड राजावरून ४ ऑगस्ट रोजी सकाळी पालखी बुलढाणा जिल्ह्यातील पुढील प्रवासाला रवाना झाली. सिंदखेडराजा येथून बीबी , लोणार, मेहकर मार्गे निघालेल्या पालखीने खामगाव तालुक्यात प्रवेश केला. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने आणि आवार या गावात पालखी मुक्कामी होती.
लासुरा येथे वैद्यकीय कक्ष
दरम्यान पालखीसोबत पायी चालणाऱ्या भक्त गणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून लासुरा फाटा येथे विशेष वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला आहे . १८ किलोमीटरच्या या पायी दिंडी प्रवासामध्ये श्री चे आबालवृद्ध भक्तगण या पालखी प्रवासात सहभागी होतात. या मदत कक्षात दोन रुग्णवाहिका, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, आदि कर्मचारी आणि औषधी साठा ठेवण्यात आला आहे .पायी चालणाऱ्या श्रीच्या भक्तगणांना काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय मदत कक्षेची मदत घ्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासन आणि भुमीपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले.