लोकसत्ता टीम

चंद्रपूर: मनोरंजनासाठी परवानगी असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरच्या नावावर चंद्रपूर शहरात सर्रास जुगार सुरु आहे. याप्रकरणात काँग्रेसग्च्या असंघटीत कामगार सेलचे माजी शहर अध्यक्ष विनोद संकत याला अटक करण्यात आले. दरम्यान अवैधरित्या मनोरंजनाच्या नावावर जुगार चालविणाऱ्या या पार्लरची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित क्षेत्राच्या ठाणेदारांनी दिले आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्हिडिओ गेम पार्लर चालवीत आहेत. यामध्ये मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद असलेल्या काही युवा नेत्यांचा देखील समावेश आहे.

जिल्ह्यात १५ व्हिडीओ गेम पार्लर आहे. येथे क्वाईनच्या माध्यमातून जुगार खेळला जातो. या मशीन्स सेट केल्या जातात.त्यामुळे जुगार खेळणारे कधीच जिंकत नाही. अनेकांनी आपले घरदार या पार्लरच्या नादात विकले आहे. पार्लरचे मालकांनी मात्र बक्कळ पैसा कमाविला. या अवैध धंद्यात चंद्रपूर शहरात ‘त्रिमूर्ती’ने आपले साम्राज्य निर्माण केले. गत काही वर्षांपासून ते बिनदिक्कतपणे हा अवैध धंदा करीत आहे. त्यातून त्यांचे ‘विशाल’ साम्राज्य निर्माण झाले. दोन जण नगरसेवक सुद्धा झाले.

आणखी वाचा-सोयाबीन पीक विमाधारक शेतक-यांना मिळणार २५ टक्के अतिरिक्त रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

या धंद्यात बहुतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारीच गुंतले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आजवर कारवाई होत नव्हती. काल संकत यांच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आणि त्यांचे धाबे दणाणले. संकत यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे या व्हिडीओ पार्लरच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहे. चंद्रपूर शहरातील रामनगर, शहर पोलिस ठाणे, दुर्गापूर आणि जिल्ह्यातील तहसीलदार आता या व्हिडीओ पार्लरची चौकशी करतील.

आणखी वाचा-राज्यात अजूनही पावसाची नऊ टक्के तूट

परवाना, पार्लर सुरु करण्याच्या वेळा, तिथे चालणारे अवैध व्यवसाय आदींची तपासणी करतील. येत्या १५ ऑक्टोंबरपर्यंत हा तपासणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. विशेष म्हणजे राजुरा येथे देखील मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारे जुगार अड्डे सुरू आहेत. जिल्ह्यात तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात देखील जुगार भरविले जात आहेत. तर पडोली परिसरातील छोटा नागपूर येथे एक माजी नगरसेवक जुगार बाजार भरवित होता.

Story img Loader