वर्धा : महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्याबद्दल मनोहर भिडे उर्फ कुलकर्णी यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. वर्धा जिल्ह्याची गांधी जिल्हा म्हणून ओळख आहे. म्हणून गांधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची ही नैतिक जबाबदारी ठरते की त्यांनी अशा प्रवृत्तीचे तोंड बंद पाडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण जिल्ह्यातील खासदार, आमदार याबद्दल एक शब्दही बोलत नाही, म्हणून प्रश्न विचारा, हे आंदोलन करीत असल्याचे भारतीय लोकशाही अभियान व जिल्हा सर्वोदय मंडळाने आज स्पष्ट केले.
खासदार रामदास तडस व आमदार डॉ. पंकज भोयर यांना प्रश्न विचारा म्हणून निवेदन देण्यात आले. आनंद निकेतन संस्थेच्या सुषमा शर्मा, राष्ट्रीय युवा संघटनेचे प्रशांत नगोसे, किसान अधिकारचे सुदाम पवार, सर्वोदय मंडळाचे कन्हैय्या चांगणी, साम्यवादीचे यशवंत झाडे, सेवादलाचे पंकज इंगोले, प्रशांत गुजर, अनिसच्या सुचिता ठाकरे, युवा फोरमचे सुधीर पांगुळ आदी सहकाऱ्यांनी हे निवेदन देत जाब विचारला.
हेही वाचा – गडकरींनी सांगितले कार्यकर्त्याचे महत्त्व; म्हणाले, “सायकल कितीही चांगली असली तरी..”
भिडेंबाबत या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन या गांधीवादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नेत्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.