पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांकडे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत जनजागृतीच्या कार्यक्रमांवर भर न देता लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या मंदिराच्या व राजवाडय़ांच्या प्रतिकृती आणि देखावे तयार केले जात आहेत. शिवाय सजावट, रोषणाईवर जास्त भर दिला जात आहे. देखावे आणि सजावटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात कोटय़वधी रुपये खर्च होत आहे.
गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हटले की सार्वजनिक गणेश मंडळात नकला, नाटक, वाद्यवृदांचा कार्यक्रम, कीर्तन, भजन, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, चित्रपट आदी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असायची आणि त्याचा आनंद वस्तीतील लोक घेत होते. राष्ट्रहितास्तव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि केसरीच्या माध्यमातून या उत्सवाला आकार देण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध पातळीवरील माणसे एकत्र आली आणि काही विशिष्ट विचार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. १८९३ मध्ये सुरू झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप करमणूक आणि उत्सव प्रधान झाले होते. गणेशोत्सवात कुठले कार्यक्रम आहेत हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक गणेशोत्सव मंडळाच्या निमंत्रण पत्रिकांची वाट पाहात होते. आज मात्र पत्रिका असल्या तरी त्याचा उपयोग केवळ विविध कंपन्याच्या जाहिरातीसाठी केला जातो आणि कार्यक्रमांचा मात्र त्यात लवलेश नसतो. विविध देखावे तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात असून त्यासाठी मुंबई आणि कोलकाताच्या कारागिरांना बोलविले जाते. त्यांची किमान पंधरा दिवस राहण्याची, खाण्याची व्यवस्था मंडळातर्फे केली जाते आणि त्यांना लाखो रुपये दिले जातात. दहा दिवस देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असली तरी लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता त्या उद्देशाचे काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
पांढराबोडीमधील एकता गणेश मंडळाचे प्रमुख आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे देखावे तयार केले जात असल्यामुळे आमचा कार्यक्रमांवर भर नसतो. मात्र, वस्तीमधील लोकांचे कार्यक्रम केले जातात. विदर्भात सर्वात उंच मूर्ती बसविण्यासोबत देशातील विविध स्थळांची माहिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्थळांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात.
भेंडे लेआऊट गणेश मंडळाचे ईश्वर ढेंगळे म्हणाले, गणेशोत्सवात सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम कमी झाले याची खंत असली तरी लोकमान्य टिळकांचा विचार जागृत ठेवत ऐतिहासिक देखावे तयार केले जातात. यावेळी अतुल्य भारत एक दर्शन हा देखावा तयार केला आहे. यावर मोठा खर्च होतो. समाज प्रबोधनाच्या दृष्टीने कार्यक्रम कमी झाले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
– इतवारीतील संती गणेश मंडळाचे संजय चिंचोले म्हणाले, दरवर्षी वेगवेगळ्या मंदिराचे देखावे तयार करीत असताना त्यातून धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतो. मंडळातर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवित असल्यामुळे गणेशोत्सवात त्यावर फारसा जोर नसतो.
संघ कार्यालय परिसरातील क्रांतीकारक स्मृती संवर्धन संस्थेचे पदाधिकारी गजानन नेरकर यांनी सांगितले, पूर्वी गणेशोत्सव मंडळात चित्रपट, नकला, नाटक, परिसंवाद, वादविवाद, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा आदी सांस्कृतिक आणि वैचारिककार्यक्रमांची रेलचेल असायची. मात्र, आज कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणारा खर्च बघता सांस्कृतिक कार्यक्रम बंद करावे लागले.
उत्सवाच्या पहिल्याच दिवशी तलावांतील पाणी प्रदूषित
यावर्षीही महापालिकेने मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम तलावांची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, गणरायासाठी सुरू केलेल्या या मोहिमेला गौरीने छेद दिला आणि गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तलावांचे पाणी प्रदूषित झाले.
तलावातील पाणी प्रदूषित होत असल्याची ओरड पर्यावरणवाद्यांकडून गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पर्यावरणवाद्यांची ही ओरड खरीही होती कारण तलावातील मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कृत्रिम तलावांचा पर्याय त्यासाठी पर्यावरणवाद्यांनी सुचवला. या पर्यायाला प्रतिसाद देणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढत असले तरीही म्हणावे तसा प्रतिसाद अजूनही नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्भवलेला हा पर्यावरणाचा मुद्दा गणेशोत्साच्या एक दिवस आधी येणाऱ्या गौरीमुळे सुटण्याऐवजी आणखी गुंतण्याची चिन्हे आहेत. हरितालिकेच्या निमित्ताने पूर्वी गहू पेरून परडय़ांवर गौरी उगवल्या जात. त्यातच मग बांगडय़ा, काच अशा सौभाग्याचे लक्षण असलेल्या वस्तू मांडल्या जात. ही प्रथा कमी झाली असली तरीही ती पूर्णपणे बंद झालेली नाही. गहू पेरुन गौरी उगवण्याऐवजी रेतीची पिंड काढून त्याची पूजा केली जाते, पण बांगडय़ा, काच, कापड अशा वस्तू त्यात मांडल्या जातात. फुटाळा तलावावर एअरफोर्सच्या बाजूने ग्रीन विजिल फाऊंडेशन या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशीपासून कार्यरत आहेत. त्यावेळी त्यांना गौरी विसर्जनासाठी आलेल्या अनेक महिलांनी गव्हाच्या पेरलेल्या गौरी, त्यातील सामानासह तलावात टाकल्याचे दिसून आले. गौरीसह पॉलिथीन, प्लॅस्टिक अशा कित्येक वस्तू त्यांनी तलावात स्वाहा केल्याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कृत्रिम तलावातील विसर्जनाचा फज्जा उडाला. वास्तविक महापालिकेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशीपासून या ठिकाणी त्यांची फौज उभारायला हवी होती, असे मत यावेळी फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केले.

Story img Loader