* नियमांचे उल्लंघन, कारवाईकडेही दुर्लक्ष ’ * एक खिडकी’ योजनेचीही ऐसी-तैशी
रस्त्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप उभारणीस मनाई असतानाही नियम धाब्यावर बसवून शहराच्या विविध भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर विविध मंदिराच्या, राजवाडय़ाच्या प्रतिकृती आणि देखावे उभारले जात आहेत. मात्र, कुठलीही कारवाई महापालिकेने केली नाही. सार्वजानिक गणेशोत्सवासाठी परवानगी घेण्यासाठी महापालिकेने एक खिडकी योजना सुरू केली असताना नोंदणीकृत ७३० मंडळांपैकी आतापर्यंत केवळ २३० मंडळांनी अर्ज केले आहेत.
गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असताना शहरातील विविध भागांत गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असून रस्त्यावर मोठे मंडप आणि आकर्षक देखावे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पूर्वी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सार्वजनिक गणेश मंडळात आकर्षक देखावे उभारण्यापेक्षा सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत ती कमी झाली असून आता विविध सार्वजानिक गणेश मंडळांमध्ये देखावे आणि मंदिराच्या प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. एरवी शहरातील विविध भागांत अतिक्रमण करणाऱ्या छोटय़ा विक्रेत्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात असताना दुसरीकडे मात्र अनेक गणेश मंडळांच्या वतीने शहरातील विविध वस्त्यांमध्ये किंवा वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मंडप उभारले गेले असतानाही त्यांच्यावर मात्र कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.
पाताळेश्वर मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘महालचा राजा’ गणेशाची प्रतिष्ठापना केली जात असून त्या ठिकाणी आकर्षक देखावा आणि प्रतिकृती उभारली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून काम सुरू आहे. या परिसरात भारतीय जीवन विमा कार्यालयासह शाळा, महाविद्यालय असल्यामुळे वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो. माजी महापौरांच्या निवासस्थान परिसरात देखावा उभारला जात असून त्या भागातून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. सराफा बाजारकडून निकालस मंदिराकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मार्गावर रस्त्यावर मंडप उभारण्यात आला असून त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे.
याशिवाय वर्धमाननगर, सतरंजीपुरा, नंदनवन, गांधीपुतळा, रेशीमबाग, महाल, जागनाथ बुधवारी यासह शहरातील विविध भागांत रस्त्यांवर मंडप उभारल्याचे समोर आले आहे. त्यातील किती मंडळांनी परवानगी घेतली आहे, याची माहिती घेतली जात नाही. महापालिकेने गणेशोत्सवाच्याोरवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू केली असली तरी २१ ऑगस्टपर्यंत केवळ २३० अर्ज आले आहेत. त्यापैकी १४६ मंडळांनी अजूनही परवानगीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले.