‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत उद्या, गुरुवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे.
बाप्पांच्या आगमनाची तयारी आज सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून आली. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती. सार्वजनिक गणेश मंडळात देखावे तयार केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. चिटणीस पार्कमध्ये मूर्तीकारांनी दुकाने थाटली असून त्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसून आली.
संती गणेशोत्सव मंडळासह रेशीमबागेतील नागपूरचा राजा आणि एचबी टाऊनमधील विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली गणेशमूर्ती ढोल ताशांच्या निनादात दुपारी चितार ओळीतून आणण्यात आली. चितारओळीत सकाळच्यावेळी झालेली गर्दी बघता तिकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद न केल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. चितारओळीत मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे गणपतींच्या मोठय़ा मूर्ती चितारओळीतून बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाल, बडकस चौक आणि सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावर दुपारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा