ढोलावर पडलेला टिपरूचा ठोका आणि त्याला ताशाच्या तडतडाटाने दिलेली साथ यातून निर्माण झालेला नादब्रम्ह! या नादब्रम्हाच्या निर्माणात पुरुष आणि मुलेच नव्हे तर बरोबरीने युवतीसुद्धा! गेल्या दोन वर्षांपासून हा नादब्रम्ह नागपूरकरांना साद घालतोय. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरीच्या किल्ल्यावर विजयोत्सव ढोल-ताशा वाजवून साजरा केला. लोकमान्य
टिळकांनी ढोल-ताशाला गणेशोत्सवाची ओळख बनवली आणि आता हाच वारसा तरुणाई पुढे नेत आहे. शिवाजी महाराजांनी सुरू केलेला वारस्याला त्यांच्याच नावानिशी तीन वषार्ंपूर्वी सुरुवात करणाऱ्या ‘शिवमुद्रा’त आज एक-दोन नव्हे तर तब्बल ४५ युवतींची फौज अधिराज्य गाजवत आहे.
कमरेला ढोल अथवा ताशा बांधून आणि त्यावर टिपरूचा आघात करून तासन्तास नाद निर्माण करण्यासाठी प्रचंड ताकद लागते. त्यामुळे महिलांकडून ती अपेक्षा करावी का, तर त्यावर नाही हेच उत्तर येईल. मात्र, गेल्या काही वर्षांत हा नकार होकारात रूपांतरीत झालाय. पुणे, मुंबईच्या बरोबरीने आता नागपुरातही ‘शिवमुद्रा’ या ढोल-ताशा पथकात युवतींची संख्या पुरुष आणि मुलांच्या बरोबरीने झाली आहे. ‘शिवमुद्रा’ने तीन वर्षे पूर्ण केली आहेत. दोन वषार्ंपूर्वी त्यांनी महिलांसाठी नोंदणी सुरू केली. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो दोन गृहिणींनी. गृहिणींच्या हातात ढोल-ताशे बघून इतर गृहिणींना स्फुरण चढले आणि त्यांचाही प्रवेश या पथकात झाला. गृहिणी करू शकतात तर आपण का नाही, हे युवतींना वाटले आणि मग त्यांचाही शिरकाव झाला. दोन वर्षांच्या या प्रवासात आजच्या घडीला सात-आठ नोकरी करणाऱ्या महिला, काही व्यावसायिक, काही गृहिणी तर इतर मुली आहेत. घरच्या कामापेक्षा समाजात काहीतरी वेगळे करतोच ही भावना त्यांच्यात आहे. त्यातही शिवरायांचा वारसा समोर नेत असल्याचा अभिमानदेखील आहे. म्हणूनच कदाचित कुटुंबाचाही त्यांना पाठिंबा आहे. एरवी ढोल-ताशा ही महिलांची मक्तेदारी नाही, या भावनेतून विरोध झाला असता. येथे मात्र कुटुंबाचा, पालकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. ढोल-ताशा कमरेला अडकवून ते वाजवणे खरे तर खूप कठीण, पण सरावाने त्यांनी त्यावर मात केली.
पुरुषांच्या आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्यावर त्यांनी हुकुमत मिळवली आहे. या वादनाबरोबरच ध्वज नाचवण्याचे कामही त्यांचे हात लीलया पार पाडतात. विशेष म्हणजे आपली कौटुंबिक आणि इतर जबाबदारी पार पाडून त्यापासून वेगळे काहीतरी काम त्या करीत आहेत. या दोन वषार्ंत त्यांनी ४० ते ५० कार्यक्रम केले आहेत. बाहेरच्या लोकांचाही त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. ‘शिवमुद्रा’चे फेसबुक पान बघून कार्यक्रम बघायला येणारे अनेकजण आहेत.
ढोलावर टिपरूचा ठोका, ताशाच्या तडतडाटाची साथ!
ढोलावर पडलेला टिपरूचा ठोका आणि त्याला ताशाच्या तडतडाटाने दिलेली साथ यातून निर्माण झालेला नादब्रम्ह
Written by रोहित धामणस्कर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-09-2015 at 07:22 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav in nagpur