एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित केलेल्या गणपतींचे शहरातील विविध भागातील तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. तलावांच्या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य गोळा केले.
गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवात नागपूर आणि जिल्ह्य़ातील वातावरण गणेशमय झाले. आज सकाळपासून शहरातील विविध भागातील गणेश मंडळांमध्ये गणेश विसर्जनाची तयारी करण्यात कार्यकर्ते व्यस्त होते. घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आलेले व सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती विसर्जनाला दुपारनंतर प्रारंभ झाला. शहरातील तलाव परिसरात गर्दी वाढू लागली. नागपुरातील मानाचा व प्राचीन गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
शुक्रवार तलाव, फुटाळा तलाव, नाईक तलाव, सक्करदरा तलाव, सोनेगाव तलाव, कोराडी व कामठी तलावाचा परिसर श्री गणरायाच्या आरतीने मंगलमय होऊन गेला. फुटाळा आणि सोनेगाव तलाव परिसरात कठडे उभारण्यात आल्यामुळे वाहने तलावाच्या अलीकडे अडविली जात होती. सायंकाळी सहानंतर शुक्रवार, सोनेगाव व फुटाळा तलावावर विसर्जनासाठी गर्दी होऊ लागली. सजवलेल्या हातगाडय़ांवर, मारुती व्हॅन, जीप आदी वाहनांवर श्री मूर्ती ठेवून तसेच श्रींसमोर ढोल ताशे, बेंजो या वाद्यांबरोबरच डीजेवर मंगलमय गाण्यांच्या सीडी लावून सार्वजनिक व घरगुती श्री विसर्जनाला मिरवणुकीचे स्वरूप आले होते. शहरातील विविध महाविद्यालये आणि वसतिगृहातील युवक-युवती वाद्यांच्या तालावर नाचताना दिसत होते. फुटाळा तलाव परिसरात मोठे गणपती आणि घरगुती गणपती विसर्जनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मोठय़ा वाहनांमुळे रविनगर परिसरात सायंकाळच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाली होती, त्यामुळे मंडळांना ताटकळत राहावे लागले होते. नागपूरच्या राजा असलेल्या गणरायाची सकाळीच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघून कोराडी तलावात विसर्जन करण्यात आले. ‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजराने फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा व शुक्रवार तलावाच्या काठचा परिसर निनादून गेला होता. गणपतींची मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सामाजिक, पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांंनी मदतकार्य केले.
तलावाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या अग्निशामक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी विसर्जन ठिकाणी उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध तलावातील पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी निसर्ग विज्ञान मंडळ, ग्रीन व्हील, रोटरी क्लबसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिर्धी निर्माल्य गोळा करीत होते. यासाठी तलावांजवळ मोठे कलश ठेवण्यात आले.
कृत्रिम तलाव
शहरातील विविध भागातील तलावात गणपतीचे विसर्जन न करता ते कृत्रिम तलावांत करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आल्यानंतर शहरातील विविध भागात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात १३० च्या जवळपास कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. सोनेगाव आणि अंबाझरी ओव्हरफ्लो परिसरात कृत्रिम टाके तयार करण्यात आले. सोनेगाव तलावात विसर्जन करणाऱ्यांची संख्या फारच तोकडी होती. सक्करदरा तलावामध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असे आवाहन करण्यात आल्यानंतर लोकांनी तलावात विसर्जन केले.
३०० टन निर्माल्य गोळा
शहरातील विविध भागातील तलाव परिसरात गोळा करण्यात आलेले निर्माल्य घेऊन जाण्याची व्यवस्था कनक र्सिोसेस कंपनीकडे देण्यात आली असताना रात्री आठ वाजेपर्यंत ३०० टन निर्माल्य गोळा करण्यात आल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले. सोमवार आणि मंगळवारी अशीच व्यवस्था राहणार आहे त्यामुळे यावेळी सातशे टनाच्यावर निर्माल्य गोळा होण्याची शक्यता आहे.