अकोला : येत्या १९ सप्टेंबर रोजी वाजतगाजत गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ते जोमाने तयारीला लागले आहेत. यंदा गणेशोत्सवावर महागाईचे विघ्न असून मूर्तीच्या किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली. कच्चा मालाच्या भाववाढीचा परिणाम झाला. मातीच्या मूर्तीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्ती कमी दरात उपलब्ध आहेत. गणेशभक्तांचा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडेच ओढा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतूरतेने वाट पाहत आहेत. भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. अकोला शहरात गणेश मूर्ती बनवणारे अनेक मूर्तीकार आहेत. हजारो गणेश मूर्ती साकारल्या गेल्या आहेत. अकोला शहरातून इतर राज्यातसुद्धा मूर्ती पाठवल्या जातात. अगदी लहान मूर्तीपासून तर २५ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या आहेत.

हेही वाचा – गडकरी आता जुने जोडे-चप्पल गोळा करणार, योजना काय वाचा..

यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली. मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असून त्यामुळे गणेशमूर्तींच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे गणेश मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध सरकारने उठवल्याने सार्वजनिक मंडळाच्या वतीने मोठमोठ्या गणेश मूर्ती यांची मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. घरगुती गणेशमूर्ती ३०० रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मोठ्या मूर्ती पाच हजारपासून ते तीन लाखांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारी माती राजस्थानवरून येते. त्याच्या किंमती वाढल्या आहेत. मूर्ती बनविण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातील राखेचादेखील वापर करण्यात येतो. केंद्रातून राख नि:शुल्क देण्यात येत असली तरी मध्यस्थी दलाल त्याची विक्री करतात. मूर्तिकारांना राख उपलब्ध होण्यात अडचण झाली. अनेकांना महागड्या दराने राख घ्यावी लागली. मूर्तींना देण्यात येणाऱ्या रंगाच्या किंमतीमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चदेखील वाढला आहे. या सर्वाचा परिणाम मूर्तींच्या किंमतीवर झाला. मूर्तींच्या किंमतीमध्ये यंदा ३० टक्के भाववाढ झाली, अशी माहिती मातीच्या गणेशमूर्तीचे विक्रेते प्रशांत चाळीसगावकर यांनी दिली.

हेही वाचा – नागपूर : बेरोजगार तरुणांना रोजगार.. ‘इंडस्ट्री मिट’ आज..

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, शाळांच्यावतीने शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्याकडेदेखील विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. मातीच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत पीओपीच्या मूर्तींच्या किंमत कमी आहे. पीओपी पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असल्याने मातीच्या मूर्तींकडेच नागरिकांचा अधिक ओढा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesha idols became expensive 30 percent increase in idol price ppd 88 ssb
Show comments